Rohini acharya- बिहार विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर राष्ट्रीय जनता दलाच्या लालू प्रसाद यादव यांना कौटुंबिक पातळीवरही आज एक मोठा धक्का बसला. त्यांना किडनी देणारी त्यांची मुलगी रोहिणी आचार्य (Rohini acharya)यांनी राजकारण आणि यादव कुटुंबाशी संबंध तोडत असल्याची घोषणा केली. त्यांच्या निर्णयामुळे यादव कुटुंबातील वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे.रोहिणी आचार्य यांनी एक्सवर एक पोस्ट करत म्हटले की, मी राजकारण आणि मी माझ्या कुटुंबासोबतचे संबंध तोडत आहे. संजय यादव आणि रमीज यांनी मला हेच करायला सांगितले होते. मी सगळ्या गोष्टींची जबाबदारी घेत आहे.
रोहिणी यांनी आपल्या सोशल मीडियावरून लालू-राबडी यांचे तसेच तेजस्वी यादव यांचे फोटोही हटवले आहेत. त्यांनी अनेक पक्षनेत्यांना अनफॉलो केले आहे. रोहिणी यांना त्यांचे मोठे भाऊ तेजप्रताप यादव यांनीही पाठिंबा दिला आहे. माझ्या बहिणीचा अपमान कोणीही करू शकत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी लालू प्रसाद यादव यांनी तेजप्रताप यादव यांच्यासोबतचे संबंध तोडले होते. त्यानंतर तेजप्रताप यादव यांनी स्वतंत्र पक्ष काढून बिहार विधानसभा निवडणूक लढवली. आता रोहिणी यांनी संबंध तोडल्याने लालू यादव यांच्या कुटुंबाला दुसरा तडा गेला आहे.
रोहिणी आचार्य यांनी यापूर्वीही आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी सप्टेंबरमध्ये केलेल्या पोस्टमध्ये म्हटले होते की, मी एक मुलगी आणि बहीण म्हणून आपले कर्तव्य पार पाडले आहे. यापुढेही जबाबदारी पार पाडत राहीन. मला कोणत्याही पदाची लालसा नाही. मला कोणतीही राजकीय महत्त्वाकांक्षा नाही. पण, माझा आत्मसन्मान सर्वोच्च असेल.
राज्यसभा खासदार संजय यादव यांचे पक्षातील वाढते राजकीय महत्त्व, हे रोहिणी यांच्या नाराजीचे एक प्रमुख कारण असल्याचे म्हटले जात आहे. रोहिणी यांना निवडणूक लढवायची होती. परंतु त्यांनी आपल्यासाठी ज्या ज्या जागा सुचवल्या, त्यांना संजय यादवांनी नकार दिल्याचे सांगितले जाते.
संजय यादव हे राजदचे निवडणूक रणनितीकार आहेत. संजय यादवांना लालूंनीच पक्षात आणले आहे. तेजस्वी यादवांचा राजकारणान नव्याने प्रवेश झाला, त्यानंतर काही महिन्यातच त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी लालूप्रसाद यादव यांनी संजय यादव यांची नियुक्ती केली. 2015 सालापासून संजय यादव सतत तेजस्वी यादवांच्या सोबत आहेत. पक्षात त्यांचा दबदबा हळूहळू वाढला. तिकिट वाटपाचे सर्व निर्णय संजय यादवच घेत होते. यावेळी त्यांनी यात भरपूर पैसे खाल्ले अशी बिहारच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. संजय यादव हे हरियाणातील महेंद्रगड येथील नांगल सिरोही गावचे रहिवासी आहेत, ते सध्या राजदकडून राज्यसभेचे खासदार आहेत.
रोहिणी आचार्य यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये रमीज खान यांचाही उल्लेख केला आहे. ते तेजस्वी यादवांचे विश्वासू सहकारी असल्याची माहिती आहे. ते मूळचे उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यातील आहेत. रमीज खान 2016 पासून राजदसोबत सक्रिय असून सुरुवातीला ते तत्कालीन उपमुख्यमंत्री कार्यालयातील बॅकडोअर कामकाज पाहत होते. नंतर ते तेजस्वी यादव यांच्या कार्यालयाशी जोडले गेले. पुढे त्यांनी तेजस्वी यादव यांचा दैनंदिन कार्यभार, कार्यक्रम नियोजन आणि निवडणूक प्रचाराची जबाबदारीही सांभाळल्याचे सांगितले जाते.
हे देखील वाचा –
केदारनाथ यात्रेत २,३०० टन कचरा हटवण्यासाठी २५ कोटींचा खर्च
अंधेरीत मेट्रो स्थानकात संशयित बॅग सापडल्याने एकच गोंधळ उडाला; सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर









