TikTok : लोकप्रिय शॉर्ट-व्हिडिओ ॲप टिकटॉकच्या मालकी हक्कावरून अमेरिका आणि चीन यांच्यातील वाद संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. याबाबत एक करार झाल्याचे संकेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहेत.
यामुळे अमेरिकेत टिकटॉकवर येणारी संभाव्य बंदी टळू शकते. याबाबत चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी या संदर्भात बोलणार असल्याचेही ट्रम्प यांनी सांगितले आहे.
टिकटॉकवर भारतात बंदी आहे. अशा स्थितीमध्ये अमेरिकेत या ॲपची मालकी बदलल्यास, भारतातही टिकटॉक पुन्हा सुरू होणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. काही दिवसांपूर्वी भारतात कंपनीची वेबसाइट पाहता येत होती. मात्र, सरकारने ॲपवरील बंदी उठवली नसल्याचे स्पष्ट केले होते.
नेमका करार काय आहे?
अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांनी माद्रिदमध्ये झालेल्या व्यापार आणि आर्थिक धोरणांवरील चर्चेनंतर सांगितले की, टिकटॉक संदर्भात एक फ्रेमवर्क करार तयार झाला आहे. या करारानुसार टिकटॉकची मालकी अमेरिकन नियंत्रणाखाली जाईल, ज्यामुळे ते अमेरिकेत सुरू ठेवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून म्हटले की, “एका अशा कंपनीवर करार झाला आहे, ज्याला आपल्या देशातील तरुणांना वाचवायचे होते.”
अंतिम मुदतवाढ मिळण्याची शक्यता
टिकटॉकला 17 सप्टेंबरपर्यंत अमेरिकेच्या मालकी अंतर्गत जाण्यास अपयश आल्यास त्यावर बंदी घालण्याची शक्यता होती. मात्र, अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी जेमीसन ग्रीर यांनी सांगितले की, करार अंतिम करण्यासाठी 17 सप्टेंबरची अंतिम मुदत थोड्या काळासाठी वाढवली जाऊ शकते. यापूर्वी, टिकटॉकवरील संभाव्य बंदी टाळण्यासाठी चीनने काही सवलतींची मागणी केली होती, ज्याला अमेरिकेने नकार दिला होता.
याच महिन्यात व्हाइट हाऊसने अधिकृत टिकटॉक अकाउंट सुरू केले असून, त्यावर डोनाल्ड ट्रम्प यांचा एक व्हिडिओही पोस्ट करण्यात आला आहे.
हे देखील वाचा – अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारच्या ‘मित्रा’ संस्थेवर नियुक्ती; रोहित पवारांच्या उपरोधिक टीकेमुळे वाद