Toxic Coldrif Syrup Death: मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये लहान मुलांच्या मृत्यूशी जोडल्या गेलेल्या विषारी कफ सिरप (Toxic Cough Syrup) प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. मध्य प्रदेश पोलिसांनी एका बालरोगतज्ज्ञ डॉक्टरला अटक केली असून, तमिळनाडूस्थित औषध उत्पादक कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या सिरपच्या प्रयोगशाळा चाचणीत औद्योगिक रसायनांचे धोकादायक प्रमाण आढळल्याने आरोग्य क्षेत्रात खळबळ उडाली आहे. ‘कोल्ड्रीफ’ (Coldrif) नावाचे हे कफ सिरप प्यायल्याने मध्य प्रदेशात किमान 17 आणि राजस्थानमध्ये 4 मुलांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.
डॉक्टरला अटक, निलंबनाची कारवाई
सिव्हिल हॉस्पिटल, परासिया येथे कार्यरत असलेले बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रवीण सोनी यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनी यांनी 4 सप्टेंबर रोजी एका मुलाचा मृत्यू झाल्यानंतरही जवळजवळ एक महिना मुलांना हे धोकादायक सिरप देणे सुरू ठेवले होते. विशेष म्हणजे ज्या मुलांना हे सिरप देण्यास मनाई होती, त्यांनाही ते देण्यात आले.
डॉ. सोनी यांच्यावर निष्काळजीपणा आणि प्रतिकूल परिणाम माहित असूनही औषध देण्याच्या आरोपाखाली भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने तातडीने सोनी यांना निलंबित केले आहे.
सिरपमध्ये 48% पर्यंत विषारी रसायन
या कफ सिरपच्या नमुन्यांमध्ये डायथिलीन ग्लायकोल (DEG) नावाचे अत्यंत विषारी औद्योगिक रसायन धोकादायक प्रमाणात आढळले आहे. डीईजी हे सामान्यतः ब्रेक फ्लुइड आणि अँटीफ्रीजसारख्या उत्पादनांमध्ये वापरले जाते. मानवी शरीरात हे रसायन किडनी निकामी करू शकते.
औषधांमध्ये डीईजीची अनुमत मर्यादा केवळ 0.1% आहे. पण छिंदवाडा येथील दुकानांमधून गोळा केलेल्या ‘कोल्ड्रीफ’ सिरपमध्ये हे प्रमाण 46.2% पर्यंत आढळले.
विशेष म्हणजे, तमिळनाडूतील कंपनीच्या कांचीपुरम युनिटमधून घेतलेल्या नमुन्यांमध्ये हे प्रमाण तब्बल 48.2% इतके नोंदवले गेले.
कंपनीवरही गुन्हा दाखल; परवाना रद्द होणार?
श्रीसन फार्मास्युटिकल्स (Sresan Pharmaceuticals) या तमिळनाडुतील सिरप उत्पादक कंपनीवरही भेसळयुक्त औषध पुरवल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तमिळनाडू सरकारने कंपनीला त्यांच्या औषध परवाना पूर्णपणे का रद्द करू नये, यासाठी स्पष्टीकरण मागवणारी नोटीस बजावली आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एक विशेष तपास पथक (SIT) लवकरच तमिळनाडूला भेट देणार आहे.
हे देखील वाचा – जयपूरच्या SMS हॉस्पिटलमध्ये भीषण आग; 7 रुग्णांचा मृत्यू, कर्मचाऱ्यांवर पळून गेल्याचा आरोप