Home / देश-विदेश / ‘माझे मित्र नरेंद्र मोदी’; ट्रम्प यांच्याकडून पंतप्रधानांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, ‘या’ मुद्द्यांवर झाली महत्त्वाची चर्चा

‘माझे मित्र नरेंद्र मोदी’; ट्रम्प यांच्याकडून पंतप्रधानांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, ‘या’ मुद्द्यांवर झाली महत्त्वाची चर्चा

Narendra Modi Birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरची टीका सोडून...

By: Team Navakal
Narendra Modi Birthday
Social + WhatsApp CTA

Narendra Modi Birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरची टीका सोडून मोदींना फोन करून खास वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून रशियन तेलावरून भारतावर टीका करणारे आणि 50 टक्के कर लादणारे ट्रम्प यांनी अचानक सूर बदलून शांततेसाठी भारताच्या भूमिकेचे कौतुक केले आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून ट्रम्प भारतावर रशियाकडून तेल खरेदीवरून टीका करत होते. यामुळे युक्रेन युद्धाला मदत मिळत असल्याचा आरोप करून त्यांनी भारतीय वस्तूंवर 50 टक्के शुल्क लादले होते. याशिवाय व्यापार करारामुळे दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले होते आणि व्यापार चर्चा थांबली होती. मात्र, आता ट्रम्प यांनी त्यांचा सूर बदलला असून, भारतासोबतचे संबंध पुन्हा सुधारण्याचे संकेत दिले आहेत.

ट्रम्प-मोदी यांच्यामध्ये फोनवर काय बोलणे झाले?

ट्रम्प यांनी मंगळवारी पंतप्रधान मोदींना फोन करून त्यांच्या 75 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी केवळ शुभेच्छाच दिल्या नाहीत, तर शांततेसाठी भारताने दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभारही मानले. त्यांनी ‘ट्रुथ सोशल’वर लिहिले, “माझे मित्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी एक छान फोनवर चर्चा झाली. त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! ते खूप चांगले काम करत आहेत. नरेंद्र: रशिया आणि युक्रेनमधील युद्ध संपवण्यासाठी तुम्ही दिलेल्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद!”

पंतप्रधान मोदींनी याला ‘एक्स’वर उत्तर दिले, “माझे मित्र, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, माझ्या 75 व्या वाढदिवसानिमित्त फोन करून शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद. तुमच्यासारखाच मीसुद्धा भारत-अमेरिका भागीदारीला नव्या उंचीवर नेण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे. युक्रेन संघर्षावर शांततापूर्ण तोडगा काढण्यासाठी तुमच्या प्रयत्नांना आमचा पाठिंबा आहे.”

व्यापार चर्चा पुन्हा सुरू

दरम्यान, अमेरिकेने भारतासोबत नवी दिल्लीमध्ये व्यापार चर्चा पुन्हा सुरू केली आहे. गेल्या महिन्यात 50 टक्के शुल्क लावल्यानंतर दोन्ही देशांमधील ही पहिलीच समोरासमोरची चर्चा होती. अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधी कार्यालयाच्या एका शिष्टमंडळाने भारतीय वाणिज्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांशी जवळपास सात तास चर्चा केली. दोन्ही बाजूंनी लवकरच एक ‘परस्पर फायदेशीर’ व्यापार करार पूर्ण करण्याचे प्रयत्न करण्याचे मान्य केले आहे.

हे देखील वाचा – ‘बेस्टच्या निवडणुकीत ठाकरे ब्रँडचा बँड वाजवला’; देवेंद्र फडणवीस यांची उद्धव-राज ठाकरेंवर जोरदार टीका; म्हणाले…

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या