Donald Trump on India : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पुन्हा एक महत्त्वाचा दावा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी भारत रशियाकडून होणारी तेल (India Russian Oil) खरेदी थांबवण्याचे आश्वासन आपल्याला दिल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. या घोषणेमुळे आंतरराष्ट्रीय ऊर्जा व्यापार आणि धोरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
ट्रम्प म्हणाले की, “…भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्यामुळे मी समाधानी नव्हतो. त्यांनी (मोदींनी) मला आश्वासन दिले आहे की, ते रशियाकडून तेल खरेदी करणार नाहीत. ही एक मोठी गोष्ट आहे.” ट्रम्प यांनी पुढे बोलताना पंतप्रधान मोदींसोबत आपले ‘उत्तम संबंध’ असल्याचे स्पष्ट केले.
ट्रम्प यांनी स्पष्ट केले, “तेल खरेदी थांबेल. भारत आता तेल खरेदी करत नाहीत.” हा बदल लगेच होणार नसला तरी ‘थोड्याच काळात’ होईल, असेही त्यांनी नमूद केले.
भारताकडून रशियन तेल खरेदी केल्याबद्दल अमेरिकेने भारतावर 50 टक्के शुल्क लावले होते, जे जगातील सर्वाधिक शुल्कांपैकी एक आहे. यामध्ये रशियन तेल खरेदीमुळे 25 टक्क्यांचे अतिरिक्त शुल्क समाविष्ट होते. ट्रम्प यांचा हा दावा, एका आठवड्यापूर्वी त्यांचे व्यापार प्रतिनिधी जेमिसन ग्रीर यांनी केलेल्या दाव्यानंतर आला आहे, ज्यात भारताने रशियन तेलापासून दूर राहण्यास सुरुवात केल्याचे म्हटले होते.
भारताचे सार्वभौमत्व आणि पुतिन यांचा इशारा अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधींनी यापूर्वी म्हटले होते की, अमेरिका भारताच्या परराष्ट्र संबंधांवर कोणताही दबाव आणण्याचा किंवा ते ‘नियंत्रित’ करण्याचा प्रयत्न करत नाही. “भारत एक सार्वभौम देश आहे. ते त्यांचे निर्णय स्वतः नियंत्रित करतात,” असे ग्रीर यांनी स्पष्ट केले होते.
दरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी यापूर्वीच इशारा दिला होता की, अमेरिका भारत आणि चीनवर रशियासोबतचे व्यापार संबंध तोडण्यासाठी जो दबाव आणत आहे, त्याचे आर्थिक परिणाम अमेरिकेला भोगावे लागतील.
“भारताने आमच्या ऊर्जा पुरवठ्याला नकार दिल्यास, त्यांचे मोठे नुकसान होईल… आणि अशा परिस्थितीत भारताचे लोक राजकीय नेतृत्वाने घेतलेल्या निर्णयांवर बारकाईने लक्ष ठेवतील आणि ते कोणासमोरही अपमान सहन करणार नाहीत,” असे पुतिन म्हणाले होते.
हे देखील वाचा – 48 तासांसाठी युद्धविराम! पाकिस्तान-तालिबान संघर्ष तात्पुरता थांबला, पण अनेक नागरिकांचा मृत्यू