USA Iran War: मध्यपूर्वेतील युद्ध एका भीषण वळणावर उभे असताना, आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला निर्वाणीचा इशारा दिला आहे. ‘रिपोर्टनुसार, अमेरिका, इराण आणि काही मध्यस्थ देश सध्या ४५ दिवसांच्या तात्पुरत्या युद्धविरामावर चर्चा करत आहेत. हा प्रस्ताव म्हणजे या युद्धाला पूर्णविराम देण्यासाठीचा शेवटचा प्रयत्न मानला जात आहे.
ट्रम्प यांची नवीन ‘डेडलाईन’ आणि गंभीर इशारा
डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसाठी स्वतः निश्चित केलेली मुदत आता २४ तासांनी वाढवली आहे. त्यांनी ‘ट्रुथ सोशल’वर एक पोस्ट करत नवीन मुदत जाहीर केली. भारतीय वेळेनुसार बुधवारी पहाटे ५:३० वाजेपर्यंत इराणला या प्रस्तावावर निर्णय घ्यावा लागणार आहे.
जर इराणने हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली केली नाही आणि शांततेचा मार्ग स्वीकारला नाही, तर इराणमधील सर्व वीज प्रकल्प आणि पूल एकाच दिवसात उद्ध्वस्त केले जातील, अशी धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. “इराणला पुन्हा उभे राहायला २० वर्षे लागतील,” असेही त्यांनी बजावले आहे.
काय आहे ४५ दिवसांचा प्रस्ताव?
पाकिस्तान, इजिप्त आणि तुर्की या देशांच्या मध्यस्थीने हा ४५ दिवसांचा युद्धविराम लागू करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामध्ये अमेरिकेचे दूत स्टीव्ह विटकॉफ आणि इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्यात पडद्यामागून चर्चा सुरू आहे. हा ४५ दिवसांचा कालावधी दोन्ही देशांना कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करण्यासाठी एक संधी म्हणून दिला जाणार आहे. मात्र, येत्या ४८ तासांत यावर एकमत होण्याची शक्यता कमी असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
इराणची प्रतिक्रिया आणि जागतिक संकट
इराणच्या संसदेचे सभापती मोहम्मद बागेर कालीबाफ यांनी ट्रम्प यांच्या धमक्यांना ‘युद्ध गुन्हे’ संबोधले आहे. “युद्धाच्या माध्यमातून तुम्हाला काहीही साध्य होणार नाही, इराणच्या जनतेच्या हक्कांचा आदर करणे हाच एकमेव मार्ग आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद असल्यामुळे जगभरात इंधन आणि गॅसचे संकट निर्माण झाले आहे, ज्याचा मोठा फटका जागतिक अर्थव्यवस्थेला बसत आहे.
जर बुधवारी पहाटेपर्यंत ही चर्चा यशस्वी झाली नाही, तर अमेरिका इराणवर भीषण हल्ले करण्याची शक्यता आहे, ज्यामुळे संपूर्ण जग एका मोठ्या संकटात सापडू शकते.
हे देखील वाचा –











