Donald Trump on Trade With India : भारत आणिअमेरिकेमध्ये सुरू असलेल्या व्यापार करारावरील तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यातच आताचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारतासोबत कोणतीही व्यापार करणार नसल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
जोपर्यंत आयात शुल्काचा (Tariff) मुद्दा सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत कोणतीही चर्चा होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. अमेरिकेने सध्या भारतावर 50 टक्के आयात शुल्क लावले आहे. रशियाकडून (Russia) तेल खरेदी करत असल्याने हे शुल्क लागू करण्यात आले आहे.
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना ट्रम्प म्हणाले की, “जोपर्यंत आयात शुल्काचा मुद्दा सुटत नाही, तोपर्यंत व्यापार करारावर चर्चा करणार नाही.”
ट्रम्प यांनी लावले 50% शुल्क
ट्रम्प यांच्या या वक्तव्याच्या एक दिवस आधी व्हाईट हाऊसने एक कार्यकारी आदेश जारी केला होता. यात रशियासोबत व्यापार केल्यामुळे भारतावर अतिरिक्त 25 टक्के शुल्क लावण्याची घोषणा केली होती.
“भारताने रशियाकडून तेल खरेदी करून आणि ते मोठ्या नफ्यावर आंतरराष्ट्रीय बाजारात विकून रशियाच्या अर्थव्यवस्थेला मदत केली आहे, ज्यामुळे युक्रेनवरील (Ukraine) आक्रमणासाठी रशियाला निधी मिळतो,” असे व्हाईट हाऊसने म्हटले आहे.
25 टक्के शुल्क लावून ट्रम्प यांचा उद्देश रशियाच्या अर्थव्यवस्थेला मदत करणाऱ्या देशांना रोखणे आणि रशियाला त्यांच्या आक्रमकतेसाठी गंभीर आर्थिक परिणाम भोगायला लावणे हा आहे.
पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया
अमेरिकेने 50 टक्के शुल्क लावल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, “भारतातील शेतकऱ्यांच्या हितासाठी, आर्थिक परिणाम भोगावे लागले तरीही, भारत कधीही तडजोड करणार नाही.” शेतकऱ्यांचे हित ही आपली सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे सांगत मोदी म्हणाले, “यासाठी मोठी किंमत मोजावी लागेल हे मला माहीत आहे आणि मी त्यासाठी तयार आहे. भारत त्यासाठी तयार आहे.”









