Donald Trump AI Map Controversy : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या ‘ट्रुथ सोशल’ प्लॅटफॉर्मवर एक अत्यंत वादग्रस्त फोटो शेअर करून जागतिक राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.
एआय (AI) द्वारे तयार केलेल्या या फोटोमध्ये अमेरिकेचा एक नवीन नकाशा दिसत असून, त्यात कॅनडा, ग्रीनलँड आणि व्हेनेझुएला या देशांना चक्क अमेरिकेचा भूभाग म्हणून दाखवण्यात आले आहे.
नकाशात काय आहे?
या फोटोमध्ये ट्रम्प ओव्हल ऑफिसमध्ये युरोपीय नेत्यांसोबत बैठक घेत असल्याचे दिसत आहे आणि त्यांच्या मागे भिंतीवर हा सुधारित नकाशा लावलेला आहे. या बैठकीत फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर आणि नाटोचे सरचिटणीस मार्क रुटे यांसारखे दिग्गज नेते उपस्थित असल्याचे दाखवण्यात आले आहे. दुसऱ्या एका फोटोमध्ये ट्रम्प हे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वान्स आणि परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांच्यासोबत ग्रीनलँडच्या जमिनीवर अमेरिकेचा ध्वज फडकवताना दिसत आहेत, ज्यावर “ग्रीनलँड, अमेरिकन भूभाग, स्थापना 2026” असे लिहिले आहे.
ग्रीनलँडवरून तणाव वाढला
ग्रीनलँड हा सध्या डेन्मार्कच्या अखत्यारीत असलेला स्वायत्त प्रदेश आहे. ट्रम्प यांनी हा प्रदेश अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी आणि रशिया-चीनचा प्रभाव रोखण्यासाठी महत्त्वाचा असल्याचे म्हटले आहे. मात्र, डेन्मार्कने “ग्रीनलँड विक्रीसाठी नाही” असे स्पष्टपणे सुनावले आहे. इतकेच नाही तर, कोणत्याही परकीय शक्तीने ग्रीनलँडवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केल्यास सैन्याने थेट गोळीबार करावा, असे आदेश डेन्मार्कच्या संरक्षण मंत्रालयाने दिले आहेत.
कॅनडा आणि व्हेनेझुएलाचे काय?
नकाशामध्ये कॅनडाला अमेरिकेचे 51 वे राज्य म्हणून दाखवल्याने कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, व्हेनेझुएलाबाबत ट्रम्प यांनी अधिक आक्रमक पाऊल उचलले आहे. 3 जानेवारी रोजी अमेरिकन सैन्याने एका धाडसी मोहिमेत व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला ताब्यात घेतले आहे. ट्रम्प यांनी स्वत:ला व्हेनेझुएलाचे ‘कार्यवाह राष्ट्राध्यक्ष’ म्हणून घोषित केले असून तिथल्या तेल साठ्यांवर नियंत्रण मिळवण्याचे संकेत दिले आहेत.
युरोपीय देशांना इशारा
डेन्मार्क आणि ग्रीनलँडच्या बाजूने उभे राहणाऱ्या युरोपीय देशांवर ट्रम्प यांनी 1 फेब्रुवारीपासून 10 टक्के आयात शुल्क लादण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अमेरिका आणि युरोपमधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. ट्रम्प यांच्या या सोशल मीडिया पोस्टमुळे जागतिक स्तरावर राजनैतिक वादळ निर्माण झाले असून, मित्रदेशांनी या प्रकाराबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे.









