Trump on Operation Sindoor | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (US President Donald Trump) यांनी पाकिस्तानमधील (Pakistan) दहशतवादी तळांवर भारताने केलेल्या लष्करी कारवाईवर (Operation Sindoor) प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी या परिस्थितीला “दुर्भाग्यपूर्ण” असे म्हटले आणि दोन्ही देशांना तणाव कमी करण्याचे आवाहन केले.
ओव्हल ऑफिसमध्ये प्रवेश करत असतानाच आपल्याला याची माहिती मिळाली, असे ट्रम्प म्हणाले, “हे खरंच दुर्देवी आहे. मला वाटतं, भूतकाळातील थोड्याफार घटनांवरून लोकांना काहीतरी होणार आहे याची कल्पना आली असावी.”
भारत आणि पाकिस्तानमधील हल्ल्यांबद्दल विचारले असता ट्रम्प म्हणाले, “ते खूप काळापासून लढत आहेत. ते अनेक दशके आणि खरं तर, जर तुम्ही विचार केला तर शतकानुशतके लढत आहेत.” दोन्ही देशांसाठी काही संदेश आहे का, असे विचारले असता ते म्हणाले, “नाही, मला फक्त आशा आहे की हे लवकर संपेल.”
संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस (UN Secretary-General Antonio Guterres) यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानविरुद्ध भारताच्या लष्करी कारवाईबद्दल “अत्यंत चिंतित” आहे, असे त्यांनी म्हटले आहे. तर त्यांचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक म्हणाले की, “जगाला दोन्ही देशांमधील संघर्ष परवडणारा नाही.”
भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील प्रदेशात क्षेपणास्त्र हल्ले (missile strikes) केल्याची घोषणा केल्यानंतर लगेचच दुजारिक म्हणाले, “गुटेरेस दोन्ही देशांना जास्तीत जास्त लष्करी संयमराखण्याचे आवाहन करतात.”
ते म्हणाले, “नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर भारताच्या लष्करी कारवाईबद्दल संयुक्त राष्ट्र खूप चिंतित आहेत. जगाला भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी संघर्ष परवडणारा नाही.”
दरम्यान, भारताच्या संरक्षण मंत्रालयाने (Ministry of Defence) सांगितले की, त्यांनी “ऑपरेशन सिंदूर” (Operation Sindoor) सुरू केले असून पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ ठिकाणे लक्ष्य केली आहेत.
मंत्रालयाने X (ट्विटर) वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, “पहलगामद हशतवादी हल्ल्याला अचूक आणि संयमित प्रत्युत्तर म्हणून नऊ #दहशतवादी पायाभूत सुविधांच्या ठिकाणांवर केंद्रित हल्ले करण्यात आले.”
यापूर्वी, भारतीय लष्कराने (Indian Army) म्हटले होते की, पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात त्यांनी पाकिस्तानच्या आत खोलवर नऊ ठिकाणी हल्ला केला आहे. लष्कराने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, “भारतीय सशस्त्र दलांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले आणि पाकिस्तान आणि पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी ठिकाण्यांवर हल्ला केला, जिथून भारताविरुद्ध दहशतवादी हल्ल्यांची योजना आखली गेली आणि त्याचे दिग्दर्शन केले गेले.”