USA Iran Conflict: मध्यपूर्वेतील वाढत्या संघर्षामुळे जगासमोर इंधन टंचाईचे मोठे संकट उभे राहिले आहे. या परिस्थितीवर भाष्य करताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्रदेशांवर निशाणा साधला आहे. ज्या देशांना इंधनाची कमतरता भासत आहे, त्यांच्यासमोर आता फक्त दोनच पर्याय उरले आहेत. एक तर अमेरिकेकडून इंधन खरेदी करा किंवा इराणने रोखलेल्या ‘होर्मुझच्या सामुद्रधुनी’त जाऊन स्वतःचा मार्ग मोकळा करा, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे.
“आता स्वतःसाठी लढायला शिका”
या युद्धात अमेरिकेला साथ न देणाऱ्या मित्रदेशांवर ट्रम्प यांनी जोरदार टीका केली. विशेषतः ब्रिटनसारख्या देशांचा उल्लेख करत त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली की, “ज्या देशांना होर्मुझच्या सामुद्रधुनीमुळे इंधन मिळत नाहीये, त्यांना माझा सल्ला आहे की, पहिल्यांदा अमेरिकेकडून इंधन विकत घ्या, आमच्याकडे भरपूर साठा आहे. दुसरे म्हणजे, थोडे धाडस दाखवा आणि सामुद्रधुनीत जाऊन तुमचे तेल स्वतः मिळवा. आता तुम्हाला स्वतःसाठी लढायला शिकावे लागेल, अमेरिका नेहमीच तुमच्या मदतीला धावून येणार नाही.”
इंधन दरात मोठी वाढ
28 फेब्रुवारी रोजी अमेरिकेने इराणवर लष्करी कारवाई सुरू केल्यानंतर इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली आहे. जागतिक तेल पुरवठ्याचा 20 टक्के वाटा याच मार्गावरून जातो. हा मार्ग बंद झाल्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती 75 डॉलरवरून थेट 100 डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेल्या आहेत. ट्रम्प यांनी इराणला वारंवार इशारा देऊनही हा मार्ग अद्याप मोकळा झालेला नाही आणि दुसरीकडे मित्रदेशांनीही या मोहिमेत अमेरिकेला लष्करी मदत देण्यास नकार दिला आहे.
इराणची नवी रणनीती
दुसरीकडे, इराणनेही आपली भूमिका कडक केली आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर ‘टोल’ (कर) आकारण्याचा प्रस्ताव इराणच्या संसदेत मंजूर करण्यात आला असून, हा कर इराणच्या चलनात भरावा लागणार आहे. तसेच अमेरिका आणि इस्रायलशी संबंधित जहाजांवर कडक निर्बंध लादण्याची तयारी इराणने केली आहे.
शांतता करारासाठी डेडलाईन
व्हाईट हाऊसने दिलेल्या माहितीनुसार, ट्रम्प यांना 6 एप्रिलपर्यंत इराणसोबत करार करून हा सागरी मार्ग मोकळा करायचा आहे. जर इराणने शांतता करारावर स्वाक्षरी केली नाही, तर इराणचे ऊर्जा प्रकल्प आणि तेल निर्यात केंद्र असलेले ‘खार्ग बेट’ उद्ध्वस्त करण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. मात्र, इराणने अमेरिकेच्या अटी अवास्तव असल्याचे सांगून त्या फेटाळल्या आहेत आणि आखाती देशांवर जमिनीवरून हल्ले करण्याचा इशारा दिला आहे.










