Impact of Trump’s Tariffs on India: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारतावर 50 टक्के आयात शुल्क लावण्याची घोषणा केली आहे. याआधी अमेरिकेने 25 टक्के शुल्क लावले होते, आता त्यात आणखी 25 टक्के वाढ करण्यात आली आहे.
रशियन तेलाच्या आयातीवर पुन्हा 25 टक्के आयात शुल्क (Impact of Trump’s Tariffs on India) लावल्यानंतर भारताने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ठामपणे उत्तर देताना भारताने अमेरिकेचे हे पाऊल “अन्यायकारक, अवाजवी आणि अनावश्यक” असल्याचे म्हटले आहे. तसेच, “भारताच्या राष्ट्रीय हितांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील,” असा निर्धारही परराष्ट्र मंत्रालयाने व्यक्त केला आहे.
रशियातून होणाऱ्या आयातीवर लादलेल्या या नवीन दंडामुळेअमेरिकेत भारताच्या निर्यातीवर एकूण 50 टक्के शुल्क लागू होईल. हे शुल्क चीनवरील शुल्कापेक्षा 20 टक्क्यांनी आणि पाकिस्तानवरील शुल्कापेक्षा 31 टक्क्यांनी जास्त आहे. हे नवे शुल्क 21 दिवसांत लागू होईल.
भारताची प्रतिक्रिया
ट्रम्प यांनी अतिरिक्त शुल्काची घोषणा केल्यानंतर काही तासांतच भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करून सांगितले की, “गेल्या काही दिवसांपासून अमेरिका भारताच्या रशियन तेल आयातीला लक्ष्य करत आहे.”
निवेदनात पुढे म्हटले आहे की, “आमची आयात बाजारपेठेतील घटकांवर आधारित असून, ती भारतातील 140 कोटी लोकांची ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने केली जाते. त्यामुळे अमेरिका भारतावर अतिरिक्त शुल्क लावत आहे, हे दुर्दैवी आहे. कारण अनेक इतर देशही त्यांच्या राष्ट्रीय हितासाठी अशीच पावले उचलत आहेत.”
निवेदनात स्पष्टपणे म्हटले आहे की, “ही कृती अन्यायकारक, अवाजवी आणि अनावश्यक आहे. भारत आपल्या राष्ट्रीय हितांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलेल.”
ट्रम्प आपल्या भूमिकेवर ठाम
डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपियन राष्ट्रे किंवा चीनने रशियासोबत केलेल्या व्यापारावर कोणतीही कारवाई केलेली नाही, पण ते भारतावर सातत्याने टीका करत आहेत. ट्रम्प यांनी नुकतेच एका अमेरिकन प्रसारमाध्यमाशी बोलताना, “भारत एक चांगला व्यापारी भागीदार नाही,” असे म्हटले होते.
या क्षेत्रांना बसू शकतो फटका
CNBC च्या रिपोर्टनुसार, भारताच्या निर्यातीवर 50 टक्के शुल्क आकारणी ही आशियातील सर्वाधिक आहे. याचा थेट परिणाम कापड, ऑटो पार्ट्स, टायर, रसायने, कृषी रसायने आणि हिरे यांसारख्या भारतीय वस्तूंवर होईल.
युबीएस (UBS) या संस्थेच्या अंदाजानुसार, भारत आणि अमेरिकेतील व्यापारावर 8 अब्ज डॉलर्सचा परिणाम होऊ शकतो. यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार असंतुलन वाढण्याची शक्यता आहे. मात्र, फार्मास्युटिकल्स, सेमीकंडक्टर्स आणि ऍपल (Apple) सारख्या कंपन्यांच्या उत्पादनांवर या शुल्काचा परिणाम होण्याची शक्यता कमी आहे.