अमेरिकन शॉर्ट सेलर कंपनीचे आरोप वेदांत रिसोर्सने फेटाळले

Vedanta Resources

नवी दिल्ली – अमेरिकेतील शॉर्ट सेलर कंपनी व्हाईसरॉय रिसर्चने (Viceroy Research,)काल वेदांत समूहाची (Vedanta Group) पालक कंपनी वेदांता रिसोर्स आणि समूहातील मोठी कंपनी वेदांता लिमिटेडबाबत ८५ पानांचा एक अहवाल सादर (87-page Viceroy Research report )केला. अब्जाधीश अनिल अगरवाल यांचा वेदांत समूह आर्थिकदृष्ट्या तकलादू असून समूहाची पालक कंपनी कर्जबाजारी आहे, असा आरोप या अहवालात केला आहे. मात्र, वेदांत समूहाने ही माहिती चुकीची आणि निराधार असल्याचे म्हणत शॉर्ट सेलरचे आरोप फेटाळले आहेत.

या अहवालात म्हटले आहे की, वेदांत रिसोर्सवर (Vedanta Resources )जास्त कर्ज आहे. संपूर्ण समूहाची रचना ही वित्तियदृष्ट्या अशाश्वत आणि तडजोडीची असून, कर्जदारांसाठी गंभीर धोका निर्माण करणारी आहे. वेदांत रिसोर्स ही पालक कंपनी परजीवी असून, तिचे स्वतःचे काहीही कामकाज नाही. वेदांता लिमिटेडकडून मिळणाऱ्या कर्जावर वेदांत रिसोर्सचे काम चालते. या कंपनीने आपल्यावरील कर्जाची फेड करण्यासाठी वेदांत लिमिटेडकडून वारंवार पैसे घेतले आहेत. यामुळे वेदांत लिमिटेडचे मूल्य कमी होत आहे. याच कंपनीच्या बळावर कर्जदारांनी समूहाला कर्ज दिले. दरम्यान, यावर वेदांत समूहाने म्हटले आहे की, हा अहवाल म्हणजे खोडसाळपणाचा प्रकार आहे. यात दिलेली माहिती चुकीची आणि निराधार आहे. समूहाची पत ढासळावी, यासाठी हा अहवाल जाहीर केला . आमच्याशी कोणताही संपर्क न करता हा अहवाल जाहीर केला. केवळ खोटा प्रचार करणे हाच अहवालाचा हेतू आहे. सार्वजनिकरित्या उपलब्ध असलेली माहितीच पुन्हा अहवालात दिली असून, केवळ त्याला अतिरंजित स्वरूप दिले आहे. या अहवालाच्या आधारे बाजारपेठेत अस्थिरता निर्माण करून नफा कमाविण्याचा उद्देश आहे