UGC Fake Universities List: उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांसाठी केंद्र सरकारने धोक्याचा इशारा दिला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) देशातील 12 राज्यांमध्ये पसरलेल्या 32 बनावट विद्यापीठांची ओळख पटवली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, गेल्या 2 वर्षांत अशा अनधिकृत संस्थांची संख्या 20 वरून थेट 32 वर पोहोचली आहे. या संस्थांना पदवी देण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.
दिल्लीत सर्वाधिक बोगस विद्यापीठे
देशाची राजधानी दिल्ली हे या फसवणुकीचे मुख्य केंद्र बनले आहे. एकट्या दिल्लीत 12 बनावट विद्यापीठे सुरू आहेत. यामध्ये ‘ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक अँड फिजिकल हेल्थ सायन्सेस’, ‘युनायटेड नेशन्स युनिव्हर्सिटी’ आणि ‘विश्वकर्मा ओपन युनिव्हर्सिटी’ यांसारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, यातील काही संस्था तर सरकारी नियामक कार्यालयांच्या अगदी जवळ कार्यरत आहेत.
राज्यानुसार महत्त्वाचे तपशील
यूजीसीने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्येही अनेक बोगस संस्था सक्रिय आहेत. यामध्ये प्रयागचे ‘गांधी हिंदी विद्यापीठ’ आणि ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह मेडिसिन’ यांचा समावेश आहे. या यादीत आता हरियाणा, राजस्थान, झारखंड आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांचीही भर पडली आहे. महाराष्ट्रातही काही संस्थांना बोगस घोषित करण्यात आले असून कर्नाटकच्या बेंगळुरूमधील ‘ग्लोबल ह्युमन पीस युनिव्हर्सिटी’बाबत विशेष सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांचे करिअर धोक्यात
शिक्षण तज्ज्ञांच्या मते, ही विद्यापीठे कमी फी, झटपट पदवी किंवा लवचिक अभ्यासक्रमांचे आमिष दाखवून विद्यार्थ्यांची फसवणूक करतात. या संस्थांकडे ना कोणते पायाभूत सोयी-सुविधा आहेत ना अनुभवी शिक्षक. या विद्यापीठांनी दिलेल्या पदव्या सरकारी नोकरी, पुढील शिक्षण किंवा कोणत्याही कायदेशीर कामासाठी ग्राह्य धरल्या जात नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांचे पैसे आणि वेळ तर वाया जातोच, पण त्यांचे भविष्यही अंधारात येते.
प्रवेशाचा हंगाम जवळ येत असल्याने, विद्यार्थ्यांनी कोणत्याही विद्यापीठात नाव नोंदवण्यापूर्वी यूजीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन त्या संस्थेची मान्यता तपासावी, असे आवाहन करण्यात आले आहे.










