Palestine State Recognition: जागतिक राजकारणात एक मोठा बदल पाहायला मिळत आहे. ब्रिटन, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाने पॅलेस्टाईनला सार्वभौम राष्ट्र म्हणून औपचारिक मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे हे देश आपल्या पारंपरिक परराष्ट्र धोरणातून आणि अमेरिकेच्या भूमिकेपासून दूर गेल्याचे संकेत मिळत आहेत.
या तीन राष्ट्रांच्या निर्णयामुळे आता पॅलेस्टाईनला मान्यता देणाऱ्या देशांची संख्या 140 पेक्षा अधिक झाली आहे.
शांततेची शक्यता जिवंत ठेवण्यासाठी निर्णय: ब्रिटनचे पंतप्रधान
ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टार्मर यांनी आपल्या ‘एक्स’ (ट्विटर) खात्यावर पोस्ट करत म्हटले की, ‘पश्चिम आशियातील वाढत्या भयाण परिस्थितीला तोंड देण्यासाठीआम्ही शांतता आणि दोन-राष्ट्र समाधानाची शक्यता जिवंत ठेवण्याचे काम करत आहोत. याचा अर्थ, एका सुरक्षित इस्रायलच्या बाजूलाच एक सक्षम पॅलेस्टाईन राष्ट्र असणे आवश्यक आहे.’
ते पुढे म्हणाले, ‘शांततेची आशा आणि दोन-राष्ट्र समाधान पुन्हा जिवंत करण्यासाठी, मी या महान देशाचा पंतप्रधान म्हणून स्पष्टपणे सांगतो की, युनायटेड किंगडम पॅलेस्टाईन राज्याला औपचारिकपणे मान्यता देत आहे.’
जुलैमध्येच ब्रिटनने युद्धविराम आणि गाझामध्ये अधिक मदत पोहोचवण्यासारख्या काही अटी घातल्या होत्या आणि इस्रायलने या अटींचे पालन न केल्यास पॅलेस्टाईनला मान्यता दिली जाईल, असा इशाराही दिला होता.
पॅलेस्टाईनने स्वागत केले, पण इस्रायलचा तीव्र निषेध
पॅलेस्टाईनचे परराष्ट्र मंत्री वारसेन अघाबेकियन शाहिन यांनी या निर्णयाचे ‘ऐतिहासिक’ पाऊल म्हणून स्वागत केले आहे. ते म्हणाले की, हे पाऊल आम्हाला सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्याच्या जवळ घेऊन जात आहे. यामुळे कदाचित लगेच युद्ध संपणार नाही, पण ही एक सकारात्मक प्रगती आहे, ज्यावर आपल्याला काम करणे आवश्यक आहे.
याउलट, इस्रायलने या निर्णयाचा तीव्र निषेध केला आहे. काही मंत्र्यांनी याला ‘हमासला दिलेला पुरस्कार’ म्हटले आहे. इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने एका पोस्टमध्ये म्हटले की, ‘या मान्यतेमुळे हमाससारख्या जिहादी गटाला बळ मिळेल.’
यावर प्रतिक्रिया देताना ब्रिटनचे पंतप्रधान स्टार्मर यांनी स्पष्ट केले की, ‘हा निर्णय हमासला दिलेला पुरस्कार नाही, कारण याचा अर्थ हमासला सरकारमध्ये किंवा सुरक्षेत भविष्यात कोणतीही भूमिका मिळणार नाही.’ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही यावर नाराजी व्यक्त केली आहे.
कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाही पॅलेस्टाईनच्या बाजूने
ब्रिटनच्या घोषणेपूर्वी कॅनडा हा पॅलेस्टाईनला मान्यता देणारा पहिला G7 देश ठरला. पंतप्रधान मार्क कार्नी यांनी ‘पॅलेस्टाईन आणि इस्रायल या दोन्ही राष्ट्रांसाठी शांततामय भविष्याची’ आशा व्यक्त केली. त्यानंतर लगेचच ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनीही पॅलेस्टाईनला मान्यता दिल्याची घोषणा केली. हा निर्णय दोन-राष्ट्र समाधानाला गती देण्यासाठी ब्रिटन आणि कॅनडासह केलेला आंतरराष्ट्रीय प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.