Arattai App: परदेशी वस्तू व तंत्रज्ञानाच्याऐवजी भारतीय वस्तू, ॲप्सचा वापर करण्यासाठी सरकारकडून प्राधान्य दिले जात आहे. काही दिवसांपूर्वी रेल्वेमंत्र्यांनी मायक्रोसॉफ्टऐवजी झोहो प्लॅटफॉर्मचा वापर करत असल्याचे म्हटले आहे. आता केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी यांनी देखील व्हॉट्सॲपऐवजी भारतीय मेसेजिंग ॲपचा वापर करावा असे म्हटले आहे.
धर्मेंद्र प्रधान यांनी मेटाच्या व्हॉट्सॲपला (WhatsApp) भारतीय बनावटीचा पर्याय असलेल्या Arattai मेसेजिंग ॲपला पाठिंबा देण्यासाठी लोकांना आवाहन केले आहे. झोहो कॉर्पोरेशनने (Zoho Corporation) विकसित केलेला ‘अरट्टाई’ हे पूर्णपणे स्वदेशी ॲप आहे.
‘स्वदेशी’ला प्रोत्साहन: PM मोदींच्या हाकेला मंत्र्यांचा प्रतिसाद
धर्मेंद्र प्रधान यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट शेअर करताना Arattai चे वर्णन “फ्री, वापरण्यास सोपे, सुरक्षित आणि सुरक्षित” असे केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी उत्पादने स्वीकारण्याच्या केलेल्या आवाहनाचा संदर्भ देत, प्रधान यांनी लोकांना मित्र आणि कुटुंबाशी जोडलेले राहण्यासाठी ‘अरट्टाई’ सारखे ‘मेड इन इंडिया’ ॲप्स वापरण्याचे आवाहन केले.
Arattai instant messaging app developed by @Zoho is free, easy-to-use, secure, safe and ‘Made in India’.
— Dharmendra Pradhan (@dpradhanbjp) September 24, 2025
Guided by Hon’ble PM Shri @narendramodi ji’s call to adopt Swadeshi, I appeal to everyone to switch to India-made apps for staying connected with friends and family.… pic.twitter.com/Tptgbzgivg
प्रधान यांनी लिहिले, “माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वदेशी स्वीकारण्याच्या आवाहनाचे मार्गदर्शन घेत, मी प्रत्येकाला मित्र आणि कुटुंबाशी कनेक्ट राहण्यासाठी भारत-निर्मित ॲप्सवर स्विच करण्याची विनंती करतो.”
यापूर्वी केंद्रीय माहिती तंत्रज्ञान आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत Zoho च्या उत्पादनांना प्रोत्साहन दिले होते. त्यांनी त्यांचे सादरीकरण मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉइंटऐवजी Zoho Show वापरून केले असल्याचे जाहीर केले होते.
Arattai App काय आहे?
‘अरट्टाई’ हे नाव तमिळ भाषेत “सामान्य गप्पा” असा अर्थ दर्शवते, जे ॲपच्या सोप्या, दैनंदिन संवादावर लक्ष केंद्रित करते. युजर्स यावर टेक्स्ट मेसेज, मीडिया आणि डॉक्युमेंट्स पाठवू शकतात, व्हॉईस आणि व्हिडीओ कॉल करू शकतात, स्टोरीज आणि चॅनल्स बनवू शकतात.
गोपनीयतेचा विचार करून बनवलेल्या अरट्टाई मध्ये सुरक्षित संवादासाठी एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड (end-to-end encrypted) कॉलची सुविधा आहे.
Zoho कॉर्पोरेशनची जागतिक व्याप्ती
अरट्टाई विकसित करणारी Zoho Corporation ही कंपनी 1996 मध्ये श्रीधर वेम्बू आणि टॉनी थॉमस यांनी स्थापन केली. चेन्नईमध्ये मुख्यालय असलेल्या Zoho ला ईमेल, अकाउंटिंग, एचआर, प्रोजेक्ट मॅनेजमेंट आणि सीआरएमसह 55 हून अधिक बिझनेस ॲप्लिकेशन्ससाठी ओळखले जाते.
हे देखील वाचा – लडाखमध्ये तरुण इतके आक्रमक का झाले? काय आहेत मागण्या? जाणून घ्या