US Army : इराणविरुद्धच्या युद्धात हवे तसे यश मिळत नसल्याने संतापलेले राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी लष्करातील उच्चपदस्थ अधिकार्यांची हकालपट्टी करण्याचा धडाका लावला आहे. जनरल डेव्हिड होडने आणि मेजर जनरल विल्यम ग्रीन यांच्यानंतर लष्करप्रमुख रँडी जॉर्ज यांना तत्काळ निवृत्ती स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
रँडी जॉर्ज यांना पदावरून पायउतार होण्याचे निर्देश हेगसेथ यांनी दिले.इराणविरुद्धच्या युद्धात हेगसेथ आणि ट्रम्प यांच्या मनासारखे निर्णय घेणारा दुसरा एखादा अधिकारी रँडी जॉर्ज यांच्या जागी नेमण्याचा हेगसेथ यांचा विचार आहे. अमेरिकेत लष्करप्रमुखाची नियुक्ती चार वर्षांसाठी केली जाते. रँडी जॉर्ज यांची नियुक्ती माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या काळात 2023 मध्ये झाली होती. म्हणजेच त्यांचा कार्यकाळ 2027 पर्यंत होता. मात्र हेगसेथ यांनी त्यांना तत्काळ निवृत्ती घेण्याचे निर्देश देऊन त्यांना पदावरून दूर
होण्यास भाग पाडले.
याआधी जनरल डेव्हिड होडने आणि मेजर जनरल विल्यम ग्रीन यांची ट्रम्प प्रशासनाने हकालपट्टी केली होती. होडने हे लष्कराच्या प्रशिक्षण विभागाचे प्रमुख होते.तर मेजर जनरल ग्रीन हे लष्कराच्या चॅपलिन कॉर्प्सचे प्रमुख होते.
याशिवाय देशाची केंद्रीय तपास संस्था असलेल्या एफबीआयचे संचालक काश पटेल, लष्कर सचिव डॅनियल ड्रिसकोल आणि कामगार मंत्री लॉरी चावेज-डिरेमर हे उच्चपदस्थ अधिकारी ट्रम्प आणि हेगसेथ यांच्या रडारवर आहेत, त्यांची कधीही उचलबांगडी केली जाऊ शकते, अशी चर्चा आहे.











