डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, ‘आयात शुल्क’ धोरणाला न्यायालयाची स्थगिती

US Court Blocks Trump Tariffs

US Court Blocks Trump Tariffs | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह जगभरातील विविध देशांवर अतिरिक्त आयात शुल्क लावण्याची घोषणा काही दिवसांपूर्वी केली होती. मात्र, त्यांच्या या निर्णयाला आता अमेरिकेतील एका न्यायालयाने स्थगिती दिली आहे. ट्रम्प यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय व्यापार न्यायालयाने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेल्या आयात शुल्कांना (import tariffs) स्थगिती देत एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. न्यायालयाने स्पष्ट केलं की, राष्ट्राध्यक्षांनी IEEPA कायद्याच्या (अंतर्गत “अमर्याद अधिकार” वापरले असून, यामुळे काँग्रेसच्या घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन झाले आहे.

या प्रकरणात मॅनहॅटनमधील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने ठामपणे म्हटलं की, राष्ट्राध्यक्ष केवळ “राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात असामान्य आणि असाधारण धोक्यांच्या” विरोधातच आर्थिक निर्बंध लादू शकतात. अमेरिकेच्या संविधानानुसार आंतरराष्ट्रीय व्यापाराचे नियमन करण्याचा अधिकार काँग्रेसकडे आहे, राष्ट्राध्यक्षांकडे नाही.

ट्रम्प प्रशासनाने न्यायालयाला सांगितलं की, त्यांनी आपल्या शुल्क अधिकारांचा वापर मे 2025 मध्ये भारत-पाकिस्तान संघर्षात शस्त्रसंधी करण्यासाठी केला होता. 22 एप्रिलला जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये पाकस्थित दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला होता. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, शुल्क दडपशाहीमुळे युद्धविराम शक्य झाला.

न्यायालयाच्या निर्णयात स्पष्ट म्हटलं आहे की, शुल्काचे उपयोग कायदेशीरदृष्ट्या अमर्याद असू शकत नाहीत. “राष्ट्राध्यक्षांनी शुल्काचा वापर करावा की नाही यावर आमचा विचार नाही, परंतु असा वापर कायद्याच्या चौकटीबाहेर असल्यामुळे अमान्य आहे,” असं खंडपीठाने निर्णयात नमूद केलं.हा निर्णय येताच ट्रम्प प्रशासनाने लगेचच अपील दाखल केल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, 2 एप्रिलला ट्रम्प यांनी अमेरिका-चीन आणि युरोपियन युनियन सारख्या व्यापार भागीदारांवर 10% मूळ शुल्क लागू करत अमेरिकेच्या उत्पादन क्षमतेच्या पुनर्स्थापनेसाठी व्यापक शुल्क लागू केलं. मात्र, यामुळे अमेरिकन वित्तीय बाजार डळमळीत झाले आणि काही देशांसाठी हे शुल्क काही दिवसांतच मागे घेण्यात आलं.