Dollar and Gold : अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया सातत्याने घसरत असताना अमेरिकन डॉलरचे साम्राज्यही लवकरच संपुष्टात येणार आहे, असे तज्ज्ञांनी जाहीर केल्याने खळबळ माजली आहे. अमेरिकन डॉलरची ऐतिहासिक घसरण होऊन त्याची जागा सोने घेणार आहे, असा इशारा अमेरिकेतील ख्यातनाम गुंतवणूक तज्ज्ञ पीटर शिफ यांनी दिला आहे. सुरक्षित भविष्यासाठी गुंतवणूक करणार असाल तर ती सोन्यातच करा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
जागतिक बाजारात सोने आणि चांदीच्या दरात गेले काही महिने सातत्याने वाढ होत आहे. अमेरिकेत सोन्याचा भाव 4 हजार 500 डॉलर प्रति 28 ग्रॅम तर भारतात प्रति दहा ग्रॅम (एक तोळा) सोन्याचा भाव 1 लाख 40 हजारच्या ऐतिहासिक उच्चांवर पोहोचला आहे. अमेरिकेवरील वाढता कर्जाचा बोजा, व्याजापोटी द्यावी लागणारी प्रचंड रक्कम आणि नव्याने चलनी नोटा छापण्याचा ट्रम्प सरकारचा निर्णय या कारणांमुळे डॉलरची क्रयशक्ती कमी होत चालली आहे. त्यामुळे नजीकच्या भविष्यकाळात डॉलरमध्ये मोठी घसरण होणार असून, डॉलरची मक्तेदारीच संपुष्टात येणार आहे. अमेरिकेतील मध्यवर्ती बँका डॉलरऐवजी आता मोठ्या प्रमाणावर सोन्यामध्ये गुंतवणूक करत आहेत. परिणामी डॉलर कोसळल्यावर सोने हाच गुंतवणुकीचा भरवशाचा स्रोत असणार आहे.
गेली अनेक दशके जगाच्या अर्थव्यवस्था अमेरिकन डॉलरच्या अधिपत्याखाली राहिल्या आहेत. डॉलर हा जागतिक चलनांचा राजा मानला जातो. डॉलरचा जास्तीत जास्त संचय करणे, संकटकाळी तो वापरणे हेच जगातील बहुतांश अर्थव्यवस्थांचे आजवरचे सूत्र राहिले आहे. खनिज तेलाच्या जागतिक व्यापाराचे डॉलर हेच मुख्य माध्यम राहिले आहे. या डॉलरची मक्तेदारी संपवण्यासाठी चीन प्रयत्न करीत आहे. व्यापारात डॉलरची गरज नाही अशी अर्थव्यवस्था तयार करण्याचा चीनचा प्रयत्न आहे. त्यासाठी आशियाई देश, रशिया यांना त्यांच्या चलनात व्यापार करण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. या प्रयत्नातून डॉलरचे महत्त्व कमी होत जाईल. त्यामुळे अमेरिकेची दादागिरी बंद होईल. त्याचवेळी सुरक्षित ठेव म्हणून सोन्याचे महत्त्व वाढेल. गेल्या दोन वर्षांत चीनने 40 टन सोने खरेदी केले आहे. त्यात दर महिन्याला वाढ होत आहे. सोन्याची खरेदी करणाऱ्या देशांत भारत, रशिया आणि तुर्कीचाही समावेश आहे.
चिनी जेन झी सोने
खरेदी करत आहे
भारतातील जेन झी आता मालकीचे घर विकत घेण्यास फारसे इच्छुक नाहीत. कारण घरासाठी घेतलेल्या कर्जाचे हफ्ते फेडण्यात आयुष्य वाया घालवणे त्यांना नको आहे. त्यापेक्षा भाड्याचे घर घेऊन जगाची भ्रमंती करत आयुष्याचा मनमुराद उपभोग घ्यायचा, असा भारतातील जेन झीचा विचार आहे. याच्या बरोबर उलट चीनमधील जेन झी विचार करत आहे. भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्ता यामुळे जाणाऱ्या नोकऱ्यांतून येणारी बेकारी, जागतिक अस्थिरता, कोसळणारा डॉलर ही स्थिती लक्षात घेऊन चीनची जेन झीमध्ये सध्या सोन्याचे मणी (गोल्ड बीड्स) मोठ्या प्रमाणात खरेदी करू लागली आहे.
हे देखील वाचा –
निवडणुकीच्या रणधुमाळीत आरक्षण लढवय्याची प्रकृती ढासळली; मनोज जरांगे पाटील यांना केले रुग्णालयात दाखल
उन्नावप्रकरणी जामिनाविरोधात अखेर सीबीआयची सुप्रीम कोर्टात याचिका









