US Iran negotiations failure 2026 : मध्यपूर्वेतील युद्धविराम धोक्यात आलेला असतानाच, अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स यांनी इराणसोबतच्या चर्चेबाबत मोठी माहिती दिली आहे. पाकिस्तानमध्ये इराणच्या प्रतिनिधींसोबत तब्बल २१ तास चाललेली चर्चा कोणत्याही निष्कर्षाशिवाय संपली आहे. इराणने अमेरिकेने मांडलेल्या अटी स्वीकारण्यास नकार दिल्याने हा पेच कायम आहे.
अण्वस्त्र कार्यक्रमावर तोडगा नाही
जेडी व्हान्स यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चर्चेद्वारे तोडगा काढण्याचे आदेश दिले होते. मात्र, इराणकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. “इराण येणाऱ्या काळात अण्वस्त्रे विकसित करणार नाही, असे ठोस आश्वासन आम्हाला हवे होते. त्यांचे जुने अण्वस्त्र प्रकल्प नष्ट झाले असले, तरी नवीन शस्त्रे तयार न करण्याबाबत त्यांची भूमिका स्पष्ट नाही,” असे व्हान्स यांनी नमूद केले.
“आम्ही त्यांना लष्करीदृष्ट्या हरवले आहे” – ट्रम्प
दुसरीकडे, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या चर्चेच्या निकालावर फारसे स्वारस्य नसल्याचे म्हटले आहे. ट्रम्प यांच्या मते, इराणने करार केला काय किंवा नाही केला काय, अमेरिकेचा विजय आधीच झाला आहे. “आम्ही लष्करीदृष्ट्या त्या देशाला पूर्णपणे पराभूत केले आहे. त्यांचे नौदल, वायू दल आणि रडार यंत्रणा उद्ध्वस्त झाली असून त्यांचे नेतृत्व संपुष्टात आले आहे,” असा दावा ट्रम्प यांनी केला आहे.
हॉर्मुझची सामुद्रधुनी आणि व्यापार
या चर्चेत इराणने रोखून धरलेल्या ‘हॉर्मुझच्या सामुद्रधुनी’वरही (Strait of Hormuz) भाष्य करण्यात आले. या भागातील समुद्री मार्गावर इराणने पेरलेली सुरुंगे काढण्याचे काम अमेरिकन नौदलाद्वारे सुरू आहे. व्यापारी जहाजांची वाहतूक विस्कळीत झाली असली, तरी अमेरिका आपली जहाजे सुरक्षितपणे बाहेर काढत असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.
चीनला दिला इशारा
डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी चीनलाही कडक शब्दांत सुनावले आहे. जर चीनने या युद्धात इराणला पाठिंबा दिला, तर बीजिंगला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील आणि त्यांच्यासाठी मोठ्या समस्या निर्माण होतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.











