Home / देश-विदेश / US Iran War : होर्मुझवर इराणचे नियंत्रण हवे! शुल्कही घेणार ! युद्ध थांबवायचे? इराणने कडक अटी ट्रम्प यांच्यापुढे ठेवल्या

US Iran War : होर्मुझवर इराणचे नियंत्रण हवे! शुल्कही घेणार ! युद्ध थांबवायचे? इराणने कडक अटी ट्रम्प यांच्यापुढे ठेवल्या

US Iran War: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा संघर्ष संपवण्यासाठी मध्यस्थांमार्फत 15 मुद्यांचा प्रस्ताव मांडला आहे. मात्र इराणने या...

By: Team Navakal
US-Iran Peace Talks
Social + WhatsApp CTA

US Iran War: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष  डोनाल्ड ट्रम्प  यांनी इराणसोबतचा संघर्ष संपवण्यासाठी मध्यस्थांमार्फत 15 मुद्यांचा प्रस्ताव मांडला आहे. मात्र इराणने या प्रस्तावावर कठोर 5 अटी ठेवल्या आहेत. आखाती भागातील अमेरिकेचे लष्करी तळ बंद करायचे, सर्व निर्बंध हटवायचे, लेबनॉनमधील हिजबुल्लाहवरील इस्रायलच्या कारवाया थांबवायच्या आणि होर्मुझ सामुद्रधुनीमधून जाणार्‍या जहाजांनी इराणला शुल्क द्यायचे या इराणच्या अटी आहेत. इराणच्या या अटींमुळे अमेरिका पेचात सापडली आहे. कोणतेही ठोस कारण नसताना अमेरिकेने हे युद्ध सुरू करून सर्वांचे अब्जावधीचे नुकसान केल्याने हे युद्ध थांबवण्याचा अमेरिकेवर दबाव आहे. पण नुकसानीची वसुली केल्याशिवाय इराण माघार घेणार नाही. अधिकृतपणे दोन्ही देशांनी चर्चा सुरू असल्याच्या बातम्या फेटाळल्या आहेत. पण चर्चा सुरू असून अमेरिकेला आता नमते घ्यावे लागणार आहे.


ट्रम्प प्रशासनाने इराणसमोर 15 मुद्यांचा युद्धविराम प्रस्ताव ठेवला आहे. हा प्रस्ताव पाकिस्तानच्या मध्यस्थांमार्फत इराणकडे सुपूर्द करण्यात आला आहे. अमेरिकेच्या प्रस्तावात  इराणच्या अणु कार्यक्रमावर कडक निर्बंध, त्याच्या क्षेपणास्त्र क्षमतेचे विघटन, मध्यपूर्वेतील प्रॉक्सी गटांना दिला जाणारा पाठिंबा थांबवण्याची अट आहे. यासोबतच होर्मुझ सामुद्रधुनीवरून वाहतूक पुन्हा सुरू करण्याची आणि चर्चेसाठी एक महिन्याच्या युद्धविरामाची मागणीही करण्यात आली आहे. एकीकडे अमेरिकेने शांतता प्रस्ताव दिला आहे. तर दुसर्‍या बाजूने  आधीच तैनात असलेल्या सुमारे 50,000 सैनिकांव्यतिरिक्त आणखी किमान 1,000 सैनिक पश्चिम आशियात पाठवण्याची तयारी सुरू केली आहे. याशिवाय पेंटागनकडून दोन मरीन युनिट्स तैनात करण्याची प्रक्रिया सुरू असून त्यामुळे सुमारे 5,000 नौदलाची अतिरिक्त तैनाती होणार आहे. अमेरिकेने हा प्रस्ताव ठेवला असला तरी  इस्रायल याच्या विरोधात आहे .

इस्रायल सरकारने या युद्धविराम प्रस्तावावर आश्चर्य व्यक्त केले आहे.अमेरिकेकडून अतिरिक्त सैन्य तैनात करण्याच्या तयारीसोबत हा निर्णय ट्रम्प यांची रणनीती म्हणून पाहिला जात आहे. युद्धविरामामुळे अमेरिकेला पुढील योजना आखण्यासाठी आणि सैन्य मांडणीसाठी वेळ मिळेल, असे मानले जात आहे.इराणने  युद्धविराम चर्चेच्या प्रस्तावाला सडेतोड उत्तर दिले आहे.  युद्धातील नुकसानीची आर्थिक भरपाई मिळावी आणि हिजबुल्लाहविरुद्ध इस्रायलची मोहीम थांबवण्याची मागणी केली आहे.


जगातील सर्वात महत्त्वाच्या तेल वाहतूक मार्गांपैकी एक असलेल्या होर्मुझ सामुद्रधुनीमधून जाणार्‍या जहाजांकडून शुल्क वसूल करण्याचा अधिकार मिळावा, अशीही इराणची भूमिका आहे. या कराराचा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे होर्मुझ सामुद्रधुनीवर नवीन व्यवस्था लागू करणे, ज्यामुळे या मार्गावर प्रभावीपणे इराणचे नियंत्रण राहील. भविष्यात पुन्हा संघर्ष होणार नाही याची हमी देण्याचीही इराणची मागणी आहे. इराणने सर्व आर्थिक निर्बंध हटवण्यावरही भर दिला आहे. इराणचे लष्करी प्रवक्ते इब्राहिम झोलफकारी यांनी अमेरिकेवर टीका करत म्हटले की, अमेरिका स्वतःशीच वाटाघाटी करत आहे. जोपर्यंत अमेरिका प्रादेशिक स्थैर्याबाबत इराणची भूमिका मान्य करत नाही तोपर्यंत अमेरिकेच्या आर्थिक हितांवर दबाव कायम राहील.


युद्ध सुरू झाल्यापासून इराणची भूमिका अधिक कठोर झाली असून इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सचा निर्णय प्रक्रियेवर प्रभाव वाढला आहे. चर्चा पुढे गेल्यास संसद अध्यक्ष मोहम्मद बाकर कालीबाफ आणि परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची  यांसारखे वरिष्ठ नेते सहभागी होऊ शकतात. मात्र, अंतिम निर्णय इराणच्या शक्तिशाली कट्टर नेतृत्वाकडेच राहण्याची शक्यता आहे. कठोर सार्वजनिक भूमिकेच्या पार्श्वभूमीवर, इराण काही बाबींमध्ये मात्र तडजोड करण्यास तयार असल्याचे संकेत दिले आहेत. इराण पाच वर्षांसाठी आपला बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रम थांबवण्याचा आणि युरेनियम समृद्धीकरणाची पातळी कमी करण्याचा विचार करू शकतो. तसेच, 60 टक्के समृद्ध युरेनियमच्या साठ्यावर चर्चा करण्यास आणि आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था-कडून तपासणीस परवानगी देण्यासही
तयार आहे.

चर्चांदरम्यानही हल्ले सुरूच
शांततेच्या चर्चा सुरू असतानाही संघर्ष थांबलेला नाही. इस्रायल आणि इराण यांच्यात परस्पर हल्ले सुरूच आहेत. लेबनॉन, बहरीन, कुवैत आणि सौदी अरेबिया या भागांतही तणाव वाढला आहे. इस्रायलने बेरूतच्या दक्षिण भागात हल्ले केले असून तेथे इराण समर्थित हिजबुल्लाहच्या ठिकाणांना लक्ष्य केल्याचा दावा केला आहे. लेबनॉनने इराणच्या राजदूताला देश सोडण्याचे आदेश दिले असून इराणी उड्डाणांवरही बंदी घातली आहे. यामुळे इराण आणि लेबनॉन यांच्यातील तणाव आणखी वाढला आहे.

पाकिस्तानचे जहाज अडवले
कराचीकडे जाणार्‍या एका कंटेनर जहाजाला होर्मुझच्या प्रवेशद्वाराजवळच थांबवण्यात आले, कारण त्याने आधी परवानगी घेतली नव्हती. ही घटना अशावेळी घडली आहे, जेव्हा पाकिस्तान अमेरिका आणि इराण यांच्यात चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहे. या जहाजाचे नाव सेलेन आहे. ते 23 मार्चच्या रात्री शारजाह अँकरजवरून निघून ते पाकिस्तानकडे जात होते, मात्र होर्मुझजवळ पोहोचताच अचानक दिशा बदलून परत खाडीच्या दिशेने वळले. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स नौदलाने या कारवाईच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या