US-Israel Iran War : अमेरिका व इस्रायलने तेहरानमधील विद्यापीठावर हल्ला केल्याने इराण चवताळला आहे. इराणने आज थेट धमकी दिली की, आमच्या एका विद्यापीठावर हल्ला केला तर आम्ही त्यांची दोन विद्यापीठे नेस्तनाबूत करू. अमेरिका आणि इस्रायलमधील विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना व कर्मचार्यांना आम्ही सूचना देतो की, विद्यापीठ परिसर सोडा. या इशार्याने खळबळ माजली आहे.
अमेरिका आणि इस्रायलने शुक्रवार व शनिवारच्या रात्री तेहरानमध्ये जोरदार हवाई हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये इराण युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीवर क्षेपणास्त्र मारा करण्यात आला. त्यात इमारतींचे नुकसान झाले. परंतु कोणतीही जीवितहानी झाली नाही, अशी माहिती अमेरिका देत आहे. मात्र, इराणने या हल्ल्यांना गांभीर्याने घेतले आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बाकाई यांनी एक्स पोस्ट करत आरोप केला की, अमेरिका आणि इस्रायलने गेल्या महिनाभरात इस्फहान युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी आणि इराण युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी यांसह अनेक शैक्षणिक संस्थांना लक्ष्य केले आहे. अमेरिका आणि इस्रायलने जाणूनबुजून इराणी विद्यापीठे आणि संशोधन केंद्रांवर हल्ले केले आहेत. या हल्ल्यांतून अमेरिकन-इस्त्रायली युद्धखोरीचा खरा उद्देशच सातत्याने उघड होत आहे. विद्यापीठे, संशोधन केंद्रे, ऐतिहासिक स्मारके आणि नामवंत शास्त्रज्ञांना पद्धतशीरपणे लक्ष्य करून इराणचा वैज्ञानिक पाया आणि सांस्कृतिक वारसा खिळखिळा केला जात आहे. या हल्ल्यांना आम्ही आता प्रत्युत्तर देणार आहोत.
इराणच्या सरकारी माहिती परिषदेचे प्रमुख एलियास हझराती यांनीही एक्स पोस्ट करून म्हटले की, इराणमधील विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांवर, तसेच विद्यार्थी आणि शालेय विद्यार्थ्यांवर आक्रमक हल्ले करून इराणच्या भविष्याला लक्ष्य केले जात आहे. या हल्ल्यांमधून पायाभूत सुविधांचा नाश करून इराणच्या वर्तमानाला आणि ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र या हल्ल्यानंतरही इराण अटल आणि अभेद्य राहील. इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने (आयआरजीसी) या हल्ल्यावरून अमेरिका आणि इस्रायलला इशारा दिला की, आमच्या शैक्षणिक संस्थांवरील हल्ल्याचा सूड आम्ही उगवू. आम्ही आखातातील अमेरिका किंवा इस्रायलशी संबंधित विद्यापीठांना लक्ष्य करू. या भागातील अमेरिकन विद्यापीठांचे सर्व कर्मचारी, प्राध्यापक आणि विद्यार्थी तसेच त्यांच्या आसपासच्या परिसरातील रहिवाशांना विद्यापीठांच्या परिसरापासून एक किलोमीटर दूर राहावे, असा सल्ला आम्ही देतो. अमेरिकन सरकारला या देशांतील आपली विद्यापीठे हल्ल्यापासून मुक्त राहावीत असे वाटत असेल तर त्यांनी 30 मार्च रोजी तेहरान वेळेनुसार दुपारी 12 वाजेपर्यंत अधिकृत निवेदनाद्वारे विद्यापीठांवरील बॉम्बहल्ल्याचा निषेध केला पाहिजे.
दरम्यान, आज ‘यूएसएस त्रिपोली’ या जहाजातून 3,500 अतिरिक्त अमेरिकन सैनिक मध्य पूर्वेत दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने लढाऊ विमाने आणि शस्त्रेही पाठवण्यात आली आहेत. अमेरिका इराणमध्ये अनेक आठवडे चालणार्या भू-अभियानाची तयारी करत आहे. मात्र, ट्रम्प प्रशासनाने अद्याप या प्रकरणी कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही. अमेरिकन सैन्याच्या या तैनातीवर प्रतिक्रिया देताना इराणने म्हटले की, नरकात आपले स्वागत आहे. हे सैन्य इराणी भूमीवरून शवपेट्यांमध्ये परत जाईल.
अमेरिकेत 90 लाख लोक ट्रम्पविरोधात रस्त्यावर उतरले
वॉशिंग्टन – इराणविरोधात नाहक आखाती युद्ध छेडणारे अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात जनतेचा रोष वाढत असून, काल अमेरिका आणि युरोपच्या रस्त्यावर ’नो किंग्स’ रॅलींच्या माध्यमातून 90 लाख लोकांनी निदर्शने केली. या आंदोलनाचे मुख्य केंद्र मिनेसोटा होते. सेंट पॉल येथील मिनेसोटा कॅपिटलच्या मैदानावर आणि आसपासच्या रस्त्यांवर लाखो लोक जमले होते. काहींनी अमेरिकेचे झेंडे हातात उलटे धरले होते, हे मोठ्या संकटाचे लक्षण मानले जाते.
प्रसिद्ध गायक ब्रूस स्प्रिंगस्टीन हे या रॅलीचे मुख्य आकर्षण होते. त्यांनी ’स्ट्रीट्स ऑफ मिनीपोलीस’ हे गाणे सादर केले. रेनी गुड आणि लेक्स प्रेटी यांच्या हत्येच्या निषेधार्थ आणि ट्रम्प प्रशासनाच्या आक्रमक इमिग्रेशन धोरणांविरुद्ध रस्त्यावर उतरलेल्या मिनेसोटावासीयांच्या सन्मानार्थ त्यांनी हे गाणे लिहिले होते. तर, वॉशिंग्टनमध्ये शेकडो लोकांनी लिंकन मेमोरिअल समोरून नॅशनल मॉलपर्यंत मोर्चा काढला. त्यांच्या हातात ’विदुषका, राजमुकुट खाली ठेव’, असे लिहिलेले फलक होते. राजा नको अशा घोषणाही त्यांनी दिल्या. ही निदर्शने न्यूयॉर्कपासून ते आयडाहोमधील ड्रिग्ससारख्या छोट्या शहरांपर्यंत पसरली. 50 राज्यांमध्ये 3,100 हून अधिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सुमारे 90 लाख लोक यात सहभागी झाले. सॅन दिएगो येथे सुमारे 40,000 लोकांनी मोर्चा काढला. आंतरराष्ट्रीय स्तरावर लंडन, पॅरिस आणि रोममध्येही निदर्शने झाली. रोममध्ये हजारो लोकांनी पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या विरोधात आणि इराणवरील हल्ल्यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी या आंदोलनांकडे दुर्लक्ष केले. व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या अबिगेल जॅक्सन यांनी या आंदोलनांना डाव्या विचारसरणीच्या निधीवर चालणारे असे संबोधले आणि त्यांना व्यापक लोकसमर्थन नसल्याचा दावा केला.










