Donald Trump on PM Modi : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वित्झर्लंडमधील दावोस येथे सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत भारत-अमेरिका व्यापारी कराराबाबत मोठे विधान केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक “चांगले नेते” आणि आपले “चांगले मित्र” असल्याचे सांगत ट्रम्प यांनी उभय देशांमधील व्यापारी संबंधांबाबत सकारात्मकता दर्शवली आहे.
“मोदींसोबत होणार चांगला करार”
दावोसमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले, “पंतप्रधान मोदींबद्दल मला खूप आदर आहे. ते एक उत्तम व्यक्ती असून माझे मित्र आहेत. भारतासोबत आमचा लवकरच एक चांगला व्यापारी करार होईल.”
गेल्या काही काळापासून भारत आणि अमेरिकेमध्ये व्यापार आणि आयातीवरून तणाव निर्माण झालेला असताना ट्रम्प यांचे हे विधान अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.
व्यापारी कराराचे गूढ कायम
गेल्या 5 महिन्यांपासून भारताकडून अमेरिकेला होणाऱ्या निर्यातीवर अमेरिकेने 50 टक्के शुल्क लादले आहे. रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे ट्रम्प यांनी यातील अर्ध्या शुल्काला ‘दंड’ म्हणून संबोधले होते. त्यामुळे हा व्यापारी करार कधी पूर्ण होईल, याबाबत अनिश्चितता कायम आहे. विशेष म्हणजे, ट्रम्प यांचे सहकारी हावर्ड लुटनीक यांनी अलीकडेच दावा केला होता की, मोदींनी ट्रम्प यांना फोन न केल्यामुळे हा करार रखडला आहे. मात्र भारताने हे दावे फेटाळून लावले आहेत.
कधी मैत्री, तर कधी इशारा
डोनाल्ड ट्रम्प यांची भारताबद्दलची भूमिका मिश्र राहिली आहे. एकीकडे ते मोदींना “चांगला माणूस” म्हणतात, तर दुसरीकडे शुल्क 500 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे संकेतही देतात.
“मोदींना माहीत आहे की मी खुश नाही, आणि मला खुश ठेवणे महत्त्वाचे आहे,” असे विधानही त्यांनी अलीकडेच केले होते. मात्र, दावोसमध्ये त्यांनी पुन्हा एकदा मैत्रीचा सूर आळवला आहे.
अमेरिकन अर्थव्यवस्थेचा जगाला फायदा
दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेच्या 56 व्या वार्षिक शिखर परिषदेला संबोधित करताना ट्रम्प यांनी आपल्या कारकिर्दीतील पहिल्या वर्षातील कामगिरीचा गौरव केला. ते म्हणाले की, “अमेरिका हे जगाचे आर्थिक इंजिन आहे. अमेरिकेत गुंतवणूक वाढत असून महागाईवर विजय मिळवला जात आहे. अमेरिकन अर्थव्यवस्थेच्या या प्रगतीचा फायदा संपूर्ण जगाला होत आहे.”
भारताचे नवे अमेरिकन राजदूत सर्जियो गोर यांनीही दोन्ही देशांतील चर्चा सुरू असल्याचे सांगितल्याने, आता या मैत्रीचे रूपांतर एका ठोस व्यापारी करारात कधी होणार, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
हे देखील वाचा – BMC Election: निकालानंतर फोडाफोडीचे राजकारण! ठाकरेंचे नगरसेवक फुटल्याची चर्चा









