US Tariff Exemption : अमेरिकेने देशांतर्गत महागाई कमी करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. अमेरिकेने कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्न उत्पादनांवरील पारस्परिक शुल्क (Reciprocal Tariffs) माफ करण्याची घोषणा केली आहे.
या निर्णयाचा थेट आणि मोठा फायदा भारताच्या निर्यातीलाहोणार आहे, जी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एप्रिलमधील शुल्क घोषणेमुळे मोठ्या संकटात सापडली होती. 13 नोव्हेंबरपासून लागू झालेल्या या नवीन आदेशानुसार, कॉफी, चहा, उष्णकटिबंधीय फळे, सुकामेवा आणि मसाले यासह 254 वस्तूंवरील शुल्क रद्द करण्यात आले आहे.
अमेरिकेतील वाढत्या ग्राहक किमतींच्या दबावामुळे व्हाईट हाऊस प्रशासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शुल्क माफ केलेल्या या 254 उत्पादनांमध्ये 229 कृषी वस्तूंचा समावेश आहे. या सवलतीमुळे अमेरिकेतील भारताच्या सुमारे 1 अब्ज डॉलरच्या निर्यातीला मोठा फायदा मिळण्याची अपेक्षा आहे.
भारताच्या निर्यातीला कशी चालना मिळणार?
200 हून अधिक अन्न उत्पादनांवरील पारस्परिक शुल्क हटवल्यामुळे भारतीय कृषी निर्यातदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. एप्रिलमध्ये 50 टक्के शुल्क जाहीर झाल्यानंतर निर्यातदारांमध्ये जी सुस्ती होती, ती आता दूर होऊन नवीन मागणी तयार होईल, अशी अपेक्षा आहे. अमेरिकेशी व्यापार करणाऱ्या कोणत्याही देशासाठी सर्वाधिक असलेल्या 50 टक्के शुल्कामुळे भारताच्या कृषी आणि इतर महत्त्वाच्या खाद्य क्षेत्रांना मोठा फटका बसला होता.
50 टक्के शुल्काच्या घोषणेनंतर सप्टेंबरमध्ये भारताची अमेरिकेतील निर्यात मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे 12 टक्क्यांनी घसरून 5.43 अब्ज डॉलर्सवर आली होती. चहा, कॉफी, मसाले आणि काजू यांसारख्या अनेक महत्त्वाच्या भारतीय वस्तूंची निर्यात मोठ्या प्रमाणात घटली होती. मात्र, आता शुल्कमाफीमुळे भारतातून निर्यात पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.
कोणत्या वस्तूंना होणार मोठा फायदा?
ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह (GTRI) च्या अहवालानुसार, अमेरिकेला होणारी भारताची निर्यात काही ठराविक उच्च-मूल्याच्या मसाल्यांमध्ये आणि विशिष्ट उत्पादनांमध्ये केंद्रित आहे. प्रामुख्याने मिरी, सिमला मिरची, आले-हळद-करी मसाले, जिरे, वेलची, चहा, कोको बीन्स, दालचिनी, लवंग आणि फळांच्या उत्पादनांना मोठा फायदा होईल. तथापि, टोमॅटो, लिंबूवर्गीय फळे, खरबूज, केळी आणि बहुतेक ताजी फळे यांसारख्या सवलत दिलेल्या उत्पादनांमध्ये भारताचा सहभाग कमी असल्याचे या अहवालात नमूद केले आहे.
हे देखील वाचा – Delhi Blast : दिल्ली स्फोटात वापरण्यात आलेली कार कोणाच्या नावावर होती? NIA ने केला खुलासा









