अमेरिकेत ‘फ्री पॅलेस्टाईन’ घोषणा देत इस्रायली समर्थकांवर हल्ला, पेट्रोल बॉम्ब फेकले; अनेकजण जखमी

Colorado Attack

Colorado Attack | अमेरिकेत पुन्हा एकदा ज्यू समुदायाच्या नागरिकांवर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. कोलोराडो राज्यातील बोल्डर शहरात ज्यू समुदायाच्या कार्यक्रमादरम्यान अचानकपणे हिंसक हल्ला झाला. “फ्री पॅलेस्टाईन”अशी घोषणा देत एका 45 वर्षीय व्यक्तीने जमावावर ज्वलनशील पदार्थ फेकले.

या घटनेत 6 जण जखमी झाले असून, त्यापैकी एका वृद्ध महिलेची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना गाझामधील (Gaza) युद्धामुळे अमेरिकेत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर घडली.

एफबीआयच्या डेन्व्हर फील्ड ऑफिसचे विशेष एजंट मार्क मिचालेक यांनी या घटनेची माहिती देताना सांगितले कीजखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा तपास दहशतवादी कृत्य म्हणून केला जात आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हल्ल्यानंतर पोलिसांनी मोहम्मद सोलिमन या आरोपीला ताब्यात घेतले असून, त्यालाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एफबीआयचे संचालक काश पटेल यांनी याला “हेतुपुरस्सर दहशतवादी हल्ला” म्हणून संबोधले, तर कोलोराडोचे ॲटर्नी जनरल फिल वेसर यांनी “हे स्पष्टपणे द्वेषपूर्ण कृत्य” असल्याचे मत व्यक्त केले.

ही घटना कोलोराडो विद्यापीठाजवळील प्रसिद्ध पर्ल स्ट्रीट मॉल येथे ‘रन फॉर देअर लाइव्ह्स’ या संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमादरम्यान घडली. ही संस्था 2023 साली हमासने (Hamas) इस्रायलवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बंधकांच्या सुटकेसाठी जनजागृती करते. संस्थेने सांगितले की, त्यांनी अशा पदयात्रा सातत्याने घेतल्या असून, ही पहिलीच हिंसक घटना आहे.

एक प्रत्यदर्शीने सांगितले की, ‘चार महिलांना ती जमिनीवर पडलेल्या अवस्थेत पाहत होती, त्यांच्या पायांवर गंभीर भाजल्या होत्या. हल्लेखोराने पारदर्शक द्रव असलेली काचेची बाटली उचलून फेकली होती आणि तो अर्धनग्न अवस्थेत ओरडत होता.’ या घटनेनंतर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.