Actor Vijay Karur Stampede: तामिळनाडूतील करूर (Karur) येथे अभिनेता व तामिळनाडू वेट्री कळगम (TVK) या राजकीय पक्षाचे नेते विजय (Vijay) यांच्या जाहीर सभेदरम्यान चेंगराचेंगरीची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे.
या दुर्घटनेत 9 मुलांसह किमान 39 जणांचा मृत्यू झाला असून, 50 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे. विजय यांचा पक्ष तामिळनाडू वेट्री कळगमच्या (TVK) राजकीय भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ही घटना गर्दीचे गैरव्यवस्थापन आणि दीर्घकाळ प्रतीक्षा यामुळे घडल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. याबाबत हिंदुस्तान टाईम्सने वृत्त दिले आहे.
सभेसाठी 10,000 ची परवानगी, जमले 27,000 लोक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या सभेसाठी आयोजकांनी केवळ 10,000 लोकांची अपेक्षा केली होती आणि त्यानुसारच एका मोठ्या मैदानासाठी परवानगी मागितली होती. मात्र, विजय यांची लोकप्रियता प्रचंड असल्याने प्रत्यक्ष सभेला अंदाजे 27,000 लोक जमले.
गर्दीचा हा मोठा आकडा नियंत्रणाबाहेर जाण्याचे प्रमुख कारण ठरले. तामिळनाडूचे डीजीपी (प्रभारी) जी. वेंकटरमण यांनी याबाबत माहिती दिली की, TVK च्या मागील रॅलींना यापेक्षा कमी गर्दी होती, पण यावेळी उपस्थिती अपेक्षेपेक्षा खूपच जास्त होती.
पाणी आणि अन्नाशिवाय 7 तास वाट
या दुर्घटनेमागील दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे गर्दीला करावी लागलेली प्रदीर्घ प्रतीक्षा. रॅलीची नियोजित वेळ संध्याकाळी 3:00 ते 10:00 पर्यंत होती, पण विजय यांचे चाहते आणि कार्यकर्ते सकाळपासूनच म्हणजे 11:00 वाजल्यापासून मैदानावर जमायला लागले होते.
अभिनेता विजय सुमारे 7:40 वाजता पोहोचला. तोपर्यंत गर्दीतील लोक अनेक तास पाणी आणि अन्नाशिवाय उन्हात थांबले होते, ज्यामुळे उपस्थित लोकांमध्ये थकवा आणि अस्वस्थता वाढली होती.
विजय यांनी आपल्या प्रचार वाहनावरून भाषण सुरू करताच, लोक त्यांच्या जवळ जाण्यासाठी पुढे सरकू लागले, तसेच अनेक लोक थकव्यामुळे आणि गर्दीच्या दाबामुळे बेशुद्ध पडू लागले. याच गोंधळात चेंगराचेंगरी सुरू झाली.
अनेक महिला आणि मुले या गर्दीत सापडले. स्थिती अनियंत्रित होत असल्याचे पाहून विजय यांनी आपले भाषण त्वरित थांबवले, बाटल्यांमधून लोकांना पाणी वाटले आणि पोलिसांना त्वरित मदतीसाठी आवाहन केले.
मुख्यमंत्री स्टालिन यांची मदत आणि चौकशीचे आदेश
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टालिन यांनी मृतांचा अधिकृत आकडा 39 (ज्यात 13 पुरुष, 17 महिला, 4 मुले आणि 5 मुलींचा समावेश आहे) आणि उपचार घेत असलेल्या जखमींचा आकडा 51 असल्याचे जाहीर केले. त्यांनी या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले. तसेच, मदतीची घोषणा केली आहे.
सरकारने, मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाख रुपये मदत निधी जाहीर केला. तसेच, जखमींवर सरकारी खर्चाने उपचार करण्याची घोषणा केली. या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय आयोग नेमण्याचे आदेश दिले आहेत.
या दुर्घटनेवर अभिनेता विजय यांनीही सोशल मीडियावर “यामुळे मला वेदना होत आहेत; हे असह्य आणि अवर्णनीय दुःख आहे,” अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
हे देखील वाचा –