Violence in Iran – इराणमध्ये गगनाला भिडलेली महागाई आणि डॉलरच्या तुलनेत इराणचे चलन रियालमध्ये झालेल्या प्रचंड घसरणीच्या विरोधात गेले दोन आठवडे सुरू असलेल्या हिंसक (Violence in Iran) आंदोलनाचे लोण आता संपूर्ण इराणमध्ये पसरले आहे. सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्ला खोमेनी यांच्या विरोधात जेन झी तरुणाई लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरली आहे. हे आंदोलन चिरडण्यासाठी सरकार पोलिसी बळाचा वापर करत असल्याने जागोजागी आंदोलक आणि सुरक्षा जवान यांच्यात रक्तरंजित संघर्ष सुरू झाला आहे. इराणमधील या वाढत्या जनक्षोभामुळे अमेरिका कोणत्याही क्षणी इराणमध्ये लष्करी कारवाई करून खामेनेईंना पदच्युत करण्याची शक्यता आहे. यासाठी अमेरिका इराणचे देशाबाहेर परागंदा असलेले राजपुत्र रझा पहेलवी यांना फूस लावून त्यांच्या मार्फत हा हिंसाचार घडवून आणत असल्याचा आरोप आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या जनतेला आंदोलनात पाठिंबा जाहीर केला असून खामेनेईंना कठोर कारवाईची तंबी दिली आहे. व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्यानंतर इराणचे आयातुल्ला खामेनेई ट्रम्प यांच्या रडारवर आहेत. खामेनेई यांनी पोलिसी बळाचा वापर करत आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न सुरू ठेवला तर व्हेनेझुएलाहून कठोर कारवाई केली जाईल,असा निर्वाणीचा इशाराही ट्रम्प यांनी दोन दिवसांपूर्वी दिला होता. या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगाचे लक्ष आता इराणकडे लागले आहे.
खामेनेईंच्या काळात इराणची अर्थव्यवस्था पूर्णपणे डबघाईस आली आहे. इराणचे चलन रियाल अमेरिकन डॉलरच्या तुलनेत पराकोटीचे घसरले आहे. एका अमेरिकन डॉलरची किंमत इराणमध्ये आता 14 लाख रियाल एवढ्या उच्चांकावर पोहोचली आहे. महागाईचा दर 50 टक्क्यांच्या वर गेला आहे. त्यामुळे इराणमधील जनता सरकारच्या विरोधात पेटून उठली आहे. जागोजागी दगडफेक, जाळपोळ सुरू आहे. तेहरानमधील एका मशिदीला काल आंदोलकांनी आग लावली. या आगीत संपूर्ण मशीद जळून खाक झाली. आंदोलकांनी काही वाहनेही पेटवून दिली.
इराणच्या निमसरकारी वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार इराणच्या लॉर्डेगान शहरात सशस्त्र निदर्शकांनी दोन पोलिसांची गोळ्या घालून हत्या केली. येथील परिस्थितीचे गांभीर्य दर्शवणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये सुरक्षा जवान आणि आंदोलक समोरासमोर आल्याचे दिसत आहे. गोळीबाराचे आवाज ऐकू येत आहेत. सुरक्षा जवानांवर आंदोलक दगडफेक करताना दिसत आहेत. असेच व्हिडिओ अन्य शहरांमधूनही येत आहेत. सुरक्षा जवान आणि आंदोलकांमध्ये हिंसक संघर्ष दर्शवणारे हे व्हिडिओ आहेत. जवानांकडून गोळीबार, अश्रुधुराचा मारा होत आहे तर आंदोलक जवानांवर दगडफेक करताना दिसत आहे. इराणच्या सर्वच्या सर्व 31 प्रांतांमधील 111 शहरांमध्ये हिंसाचार पसरला आहे, असा दावा अमेरिकेतील मानवी हक्कांसाठी झटणार्या संस्थेने केला आहे. आतापर्यंत या हिंसाचारात 34 आंदोलक आणि 4 सुरक्षा जवान ठार झाले आहेत. तर 2,200 आंदोलकांना अटक करण्यात आली आहे.
गेल्या वर्षी 28 डिसेंबरला इराणमध्ये सरकारविरोधी संघर्षाला सुरुवात झाली. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत इराणच्या रियालमध्ये मोठी घसरण झाल्याने सर्वप्रथम दुकानदार रस्त्यावर उतरले. इराणने अणु कार्यक्रम हाती घेतल्यामुळे अमेरिकेने लादलेले निर्बंध, सरकारमधील प्रचंड भ्रष्टाचार आणि सत्ताधार्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे गेल्या वर्षभरात इराणची अर्थव्यवस्था कोलमडण्याच्या स्थितीत पोहोचली आहे. या विरोधात दुकानदारांनी सुरू केलेले हे आंदोलन सर्वसामान्य जनतेच्या सहभागामुळे देशव्यापी बनले आहे. आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांनीदेखील मोठ्या प्रमाणात भाग घेतला असून रस्तोरस्ते विद्यार्थी खामेनेईंच्या विरोधात घोषणा देत आहेत.
अमेरिकेची रेजा पहलवींना फूस
इराणचे माजी सत्ताधीश (शहा) दिवंगत मोहम्मद रेजा पहलवी यांचे ज्येष्ठ पुत्र राजकुमार रेजा पहलवी हे राजेशाहीच्या पतनानंतर अमेरिकेच्या आश्रयाला गेले. त्यांना देशात परत आणा अशी मागणी आंदोलक करत आहेत. रेजा पहलवी यांनीदेखील खोमेनींची हुकूमशाही सत्ता उलथवून देशाची सूत्रे हाती घेण्याचे संकेत दिले आहेत. रेजा पहलवी यांनी आज एक्स पोस्ट करून ट्रम्प यांचे आभार मानले. लाखो ईराणी नागरिक स्वातंत्र्याची मागणी करत आहेत. इराणच्या सरकारने त्यांचा आवाज दाबण्यासाठी इंटरनेट, लँडलाईन फोन आणि सॅटेलाईट सिग्नलही बंद केले आहेत. इराणी जनतेचा आवाज जगाला ऐकू यावा यासाठी ट्रम्प यांनी तांत्रिक, आर्थिक आणि राजनैतिक मदत करावी, असे आवाहन रेजा पहलवी यांनी केले आहे. खोमेनेई यांचे सरकार उल्थवून टाकण्यासाठी पहलवी यांना अमेरिका पाठिंबा देत आहे.
——————————————————————————————————————————————————
हे देखील वाचा –
गोकुळवर महायुतीची करडी नजर; विश्वास पाटीलांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
दिवा–सावंतवाडी एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल; १२ जानेवारीपासून नवीन वेळ लागू









