Rahul Gandhi- लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi )यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेत मतचोरीचा हायड्रोजन बॉम्ब टाकला. हरियाणात विधानसभा निवडणुकीत 2 कोटी मतदार होते. यापैकी तब्बल 25 लाख मतदार बोगस असून, भाजपाने निवडणूक आयोगाशी हातमिळवणी करून ही मतचोरी केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. एका ब्राझिलियन मॉडेलने वेगवेगळ्या नावाने तब्बल 22 वेळा मतदान केल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय उत्तर प्रदेश भाजपा नेत्यांकडून मतदान, धुसर फोटो, मतदारांची नावे वगळणे, घर क्रमांक शून्य असे वेगवेगळे पुरावे सादर केले. हरियाणात निवडणूक झाली नाही, तर निवडणूक चोरी झाली आहे. या सगळ्यांमध्ये निवडणूक आयोगाचा हात आहे. पंतप्रधान, गृहमंत्री यांच्याशी हातमिळवणी करून आयोगाने देशातली लोकशाही संपवण्याचा कट आखला आहे, असा आरोप यांनी केला.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेत मागे लावलेल्या फलकावर ‘व्होटचोरी एच फाईल्स’ असे लिहिले होते. तब्बल सव्वा तासाच्या पत्रकार परिषदेत त्यांनी मतचोरीबद्दल खळबळजनक, धक्कादायक आरोप केले. कर्नाटकातील महादेवपुरा आणि आळंद मतदारसंघानंतर संपूर्ण हरियाणा निवडणुकीमधील मतचोरीचा बॉम्ब टाकला. हरियाणाचा मुद्दा हाताळण्यामागची भूमिका स्पष्ट करताना त्यांनी सुरुवातीलाच सांगितले की, हरियाणातल्या निकालाबद्दल कार्यकर्त्यांच्या सातत्याने तक्रारी येत होत्या. हरियाणात ऑक्टोबर 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतसर्वच मतदानोत्तर चाचण्यांमध्ये काँग्रेसला बहुमत मिळेल, असे सांगण्यात आले. पण निकालामध्ये आमचा मोठा पराभव झाला. हरियाणाच्या इतिहासात पहिल्यांदाच मतपत्रिकेवर होणारे पोस्टल मतदान आणि ईव्हीएमवरील मतदान यात मोठी तफावत दिसली. टपाली मतांमध्ये काँग्रेसला 76 तर भाजपाला केवळ 17 जागांवर आघाडी होती.

ऑक्टोबर 2024 मध्ये झालेल्या निवडणुकीत 90 मतदारसंघ असलेल्या हरयाणात भाजपाला 48 जागा मिळाल्या, तर काँग्रेसला 37 जागांवर समाधान मानावे लागले. राहुल गांधी म्हणाले की, एक्झिट पोल आणि मतपत्रिकांवर काँग्रेस आघाडीवर होती, पण भाजपाला 8 जागा जास्त मिळाल्या. या 8 मतदारसंघांत दोन्ही पक्षांच्या मतांमध्ये केवळ 22,779 चाच फरक होता. अनेकवेळा, वेगवेगळ्या लोकांकडून आम्ही या सर्व माहितीची खातरजमा करून घेतली. त्यामुळे ही सर्व माहिती अचूक, नेमकी, सत्य आहे. याबद्दलचे ठोस पुरावे आमच्याकडे आहेत. निकालानंतर भाजपाचे मुख्यमंत्री नायबसिंह सैनी यांची आम्ही एकहाती सत्ता स्थापन करणार आहोत. आमच्याकडे त्यासाठीची सर्व व्यवस्था आहे. तुम्ही काहीही चिंता करू नका, असे विधान केले होते. भाजपाकडे अशी काय व्यवस्था आहे? हरियाणात भाजपाला काँग्रेसपेक्षा 1 लाख 22 हजार अधिक मते मिळाली. पाच पद्धतीने तब्बल 25 लाख मतांची चोरी करण्यात आली. यामध्ये 5 लाख 21 हजार 619 दुबार, 93 हजार 174 अवैध पत्ते असलेले मतदार, 19 लाख 26 हजार 351 बोगस मतदार अशा एकूण 25 लाख 41 हजार 144 मतांची चोरी करण्यात आली. तसेच मतदार वगळणे, नाव नोंदवण्यासाठीच्या फॉर्म 6 आणि फॉर्म 7 चा गैरवापर करूनही लाखो मतांची चोरी झाली आहे. पण महादेवपुरा आणि आळंदमध्ये मतचोरी पकडल्यानंतर निवडणूक आयोगाने अशा पद्धतीची माहिती आम्हाला उपलब्ध करून देणे बंद केले आहे.
हरियाणात 2 कोटी मतदार आहेत, त्यापैकी 25 लाख मतांची चोरी करण्यात आली आहे. हरियाणातील आठपैकी एक मतदार फेक आहे. 25 लाख फेक मतदार असूनही आम्ही हरियाणात केवळ 22 हजार मतांनी निवडणूक हरलो. 1 फोटो, 1 मतदारसंघ आणि 100 वेळा मतदान केले. दुबार नावे, दुबार पत्ते, दुबार फोटो हटवण्यासाठी निवडणूक आयोगाकडे सॉफ्टवेअर आहे. मग आयोग ही नावे का हटवत नाही? कारण असे केल्यास निवडणुका निकोप वातावरणात होतील. मात्र आयोगाला असे होऊ द्यायचे नाही. उत्तर प्रदेशातील भाजपाचे हजारो नेते, कार्यकर्ते यांनी हरियाणात मतदान केले. दालचंदजी हे उत्तर प्रदेशात भाजपाचे सरपंच आहेत. पण त्यांनी उत्तर प्रदेशातही मतदान केले. हरियाणात दालचंदजींनी वडिलांचे नाव बदलले, पण त्यांच्या मुलाने वडिलांचे नाव कायम ठेवल्याने चोरी उघडकीस आली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणतात की, बेघर लोकांच्या नावापुढे आयोगाकडून शून्य असा घर क्रमांक नोंदवला जातो. बेघर लोक रात्री जिथे झोपायला जातात ते ठिकाणच त्यांचा घराचा पत्ता म्हणून नोंदवला जातो. पण आयुक्तांचे हे म्हणणे साफ खोटे आहे, असे राहुल गांधी म्हणाले. भाजपा नेता उमेश यांच्या घरात 66 लोक राहतात, असे मतदार यादी सांगते. याची पडताळणी केल्यानंतर तिथे एवढे लोकच राहतच नाहीत, असे आढळले. एका घरात दहाहून अधिक लोक राहत असतील, तर तिथे आयोगाच्या प्रतिनिधीने जाऊन प्रत्यक्ष पडताळणी केली पाहिजे, असा आयोगाचा नियम आहे. पण असे केले नाही. हरियाणात 93,174 मतदार बेघर असल्याचे आयोगाचे म्हणणे आहे. पण घर क्रमांक शून्य ही काही चुकीने झालेली बाब नाही, तर हा सुनियोजित कट आहे.
बोगस मतदारांच्या नोंदणीचा आरोप करतानाच राहुल गांधींनी काँग्रेसच्या पारंपरिक मतदारांना लक्ष्य करून त्यांची नावे मतदारयादीतून वगळल्याचा आरोप केला. विधानसभा निवडणुकीआधी साडेतीन लाख मतदारांची नावे हटवण्यात आली. लोकसभा निवडणुकीत मतदान केले, पण विधानसभा निवडणुकीवेळी माझे नाव डिलिट झाले, असे यावेळी सादर करण्यात आलेल्या व्हिडिओतील तरुणी म्हणते.
पत्रकार परिषदेत राहुल गांधींना काँग्रेसने निवडणुकीवेळीच हा प्रकार का रोखला नाही, बिहारमध्ये असा प्रकार घडू नये, म्हणून काँग्रेस काय करणार असे प्रश्न विचारण्यात आले. यावर राहुल गांधी म्हणाले की, आयोगाकडून उमेदवारांना शेवटच्या क्षणी मतदार यादी उपलब्ध करून दिली जाते. त्यामुळे शोधणेच शक्य होत नाही. आम्हाला केंद्रीकृत पद्धतीने सगळा डेटा एकाच ठिकाणी असलेली यादी दिली, तर लगेच आम्ही हा प्रकार शोधून काढू. पण भारतीय संविधान आणि भारतीय लोकशाहीची हत्या करण्यासाठी भाजपा आणि निवडणूक आयोगाकडून हा सगळा प्रकार सुरू आहे. त्यांच्याकडे फेक मतदार, फेक मतदारयाद्या आहेत. आमच्याकडे केवळ संविधान आहे. अशा व्यवस्थेपुढे कुणीच काही करू शकत नाही. कारण संपूर्ण यंत्रणाच ताब्यात घेण्यात आली आहे. कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करूनही फार काही हाताला लागणार नाही. बिहारमध्येही मतदारयाद्यांच्या सखोल पडताळणीच्या (एसआयआर) निमित्ताने असेच केले जात आहे. सर्वोच्च न्यायालयानेही आम्ही केलेली पोलखोल बघितली आहे. तेही प्रसारमाध्यमे बघत असतील. आम्ही दाखवलेल्या पुराव्यांबद्दल कोणतीही त्रुटी नाही. मतदार याद्यांतच घोळ असेल, तर निवडणूक हा एक निव्वळ बनाव ठरतो. एक देशभक्त म्हणून सत्य सांगणे, सत्य सादर करणे हे माझे काम आहे. एक विरोधी पक्षनेता म्हणून मी जबाबदारी पार पाडतो.
दरम्यान, राहुल गांधींची पत्रकार परिषद सुरू असतानाच केंद्रीय निवडणूक आयोगाने हरियाणातील मतदारयादी घोळाबद्दल काँग्रेसने कोणतीही तक्रार केली नाही. काँग्रेसचे पोलिंग एजंट काय करत होते? दुबार मतदारांनी भाजपालाच मतदान केले हे राहुल गांधींना कसे कळले, असा प्रश्नांचा भडिमार केला. पत्रकारांनी यावर प्रश्न विचारल्यावर राहुल गांधी म्हणाले की, मतदारयाद्यांमध्ये घोळ असणे ही राजकीय पक्ष म्हणून आमची जबाबदारी नाही. यासाठी सर्वस्वी निवडणूक आयोग जबाबदार आहे. संपूर्ण माहिती आम्हाला द्या, आम्ही लगेच हा घोळ दूर करू. संकेतस्थळावर मतदारांचा फोटो असलेली मतदारयादी दिली, तरी आम्ही लगेच चोरी पकडू. राजकीय पक्षांनी तक्रार केली नाही, असे सांगत निवडणूक आयोग आपल्या जबाबदारीपासून पळ काढू शकत नाही. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यावर आरोप केले. त्यामुळे भाजपाचे केंद्रीय मंत्री किरेन रिजुजु यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन आरोप फेटाळले. आम्ही निवडणुकीआधी प्रचंड मेहनत करतो. कार्यकर्ते दिवस-रात्र तयारी करतात, हीच आमची व्यवस्था आहे, असा पलटवार भाजपाने केला. दुसरीकडे हाताशी प्रचंड यंत्रणा असताना भाजपाने दुबार मतदारांबद्दल हरकत का घेतली नाही, याबद्दलची उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
ब्राझीलच्या मॉडेलचे
22 वेळा मतदान
राहुल गांधी यांनी आपल्या सादरीकरणात एका मुलीचा फोटो दाखवला. या मुलीने सीमा, सरस्वती, स्वीटी, विमला, रश्मी यासारखी नावे वापरून 10 बूथवर 22 वेळा मतदान केले. ही महिला दुसरी तिसरी कुणी नसून ब्राझिलियन मॉडेल आहे. हे दुबार मतदार नोंदणीचे काम एखाद्या बीएलओच्या आवाक्यातील नाही. तर एका केंद्रीय व्यवस्थेच्या मदतीने ही मतचोरी करण्यात आली आहे, असे राहुल गांधी म्हणाले. मात्र राहुल गांधींनी ’ब्राझिलियन मॉडेल’ म्हणून जो फोटो दाखवला, त्या मॉडेलचा इंटरनेटवर शोध घेतला असता वेगळीच माहिती मिळाली. ती मॉडेल एका फोटोग्राफरच्या कामाचा भाग आहे. Matheus Ferrero असे ब्राझिलच्या फोटोग्राफरचे नाव आहे. त्यानेच हा फोटो Unsplash आणि Pexels सारख्या रॉयल्टी-फ्री वेबसाईटवर अपलोड केला आहे. म्हणजेच हा फोटो सार्वजनिक वापरासाठी खुला आहे. कोणीही तो फोटो वापरू शकते. देश-विदेशातील अनेक वेबसाईट आणि फेक प्रोफाईलवरही तो दिसते.
हे देखील वाचा –
नगर परिषद, पंचायत निवडणुका 2 डिसेंबरला सर्व मागण्या धुडकावल्या! विरोधक संतापले









