Home / देश-विदेश / अखेरच्या श्वासापर्यंत लढू! एक इंचही जमीन देणार नाही ! शत्रू विजयाचे स्वप्न घेऊन थडग्यात जाईल! इराण कडाडले

अखेरच्या श्वासापर्यंत लढू! एक इंचही जमीन देणार नाही ! शत्रू विजयाचे स्वप्न घेऊन थडग्यात जाईल! इराण कडाडले

इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यातील आखाती युद्धाला आठ दिवस उलटल्यानंतरही दोन्ही बाजूंकडून हल्ल्यांची तीव्रता वाढत असतानाच आज इराणचे राष्ट्राध्यक्ष डॉ. मसूद...

By: Team Navakal
Social + WhatsApp CTA

इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यातील आखाती युद्धाला आठ दिवस उलटल्यानंतरही दोन्ही बाजूंकडून हल्ल्यांची तीव्रता वाढत असतानाच आज इराणचे राष्ट्राध्यक्ष डॉ. मसूद पेझेश्कियान यांनी अमेरिका-इस्रायलला कडक शब्दांत सुनावले. ते म्हणाले की, इराण आपली एक इंचही जमीन कोणाला घेऊ देणार नाही. इराणच्या प्रादेशिक अखंडतेवर आणि सार्वभौमत्वावर कोणताही घाला खपवून घेतला जाणार नाही. आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत लढू. या युद्धात इराण सहजासहजी माघार घेणार नाही, याचेच संकेत पेझेश्कियान यांनी आपल्या वक्तव्यातून पुन्हा एकदा दिले.


एका टीव्ही वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान म्हणाले की, आव्हाने कितीही मोठी असली तरी आम्ही आमच्या देशाच्या भौगोलिक सीमांचे रक्षण करण्यासाठी कोणत्याही थराला जाण्यास तयार आहोत. इराणची जनता एकजूट असून, कोणत्याही परकीय शक्तीच्या धमक्यांना घाबरणारी नाही. इराणने कधीही कोणावर आधी आक्रमण केलेले नाही. मात्र जेव्हा आमच्या सुरक्षेचा प्रश्न येतो, तेव्हा आम्ही मागे हटणार नाही. शत्रूला वाटते की, इराण दबावाखाली येऊन आत्मसमर्पण करेल, पण त्यांचे हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. इराणला गुडघ्यावर आणण्याचे शत्रूचे स्वप्न ते आपल्यासोबतच थडग्यात घेऊन जातील. आमचे भाग्य आम्हीच ठरवू. एपस्टिन टोळी ठरवू शकत नाही.


पेझेश्कियान यांनी काल आपल्या शेजारी देशांची माफी मागत यापुढे त्यांच्यावर हल्ला करणार नाही, असे म्हटले होते. त्यामुळे त्यांचा सूर नरमल्याचे मानले जात होते. परंतु आज त्यांनी शेजारील देशांनाही ताकीद दिली. ते म्हणाले की, इराण शांतताप्रिय देश आहे. आम्हाला प्रादेशिक स्थैर्य हवे आहे. पण जर कोणत्याही शेजारील देशाने आपली भूमी अमेरिका किंवा इस्रायलला इराणवर हल्ला करण्यासाठी वापरू दिली, तर इराण त्या देशाला जशास तसे उत्तर देण्यास किंवा मोठी लष्करी कारवाई करण्यास मागे-पुढे पाहणार नाही. जोपर्यंत शेजारील देशांकडून धोका निर्माण होत नाही, तोपर्यंत इराण शांत राहील. अन्यथा परिणाम भीषण होतील. इराणच्या इस्लामिक रिव्हॉल्यूशनरी गार्ड कॉर्प्सनेही आज असे म्हटले की, इराणी सैन्य आणि रिव्हॉल्युशनरी गार्ड दोघेही दीर्घकाळ संघर्ष करण्यास सक्षम आहेत. आम्ही अमेरिका आणि इस्रायलविरुद्ध सहा महिने युद्ध करू शकतो.


युद्धाच्या नवव्या दिवशीही आज घनघोर संघर्ष सुरू राहिला. इराणने इस्रायल, कुवेत, सौदी अरेबिया, बहारिन आणि संयुक्त अरब अमिराती (यूएई) या पाच देशांवर हल्ले केले. इराणने दुबईच्या मरिना येथील एका टॉवरवर ड्रोनने हल्ला चढवला. यामुळे टॉवरचा ढिगारा कोसळून दोन पाकिस्तानी व्यक्ती ठार झाल्या. इराणने बहारिनच्या पाणी शुद्धीकरण प्रकल्पावरही हवाई हल्ला केला. या इराणी हल्ल्यादरम्यान पडलेल्या क्षेपणास्त्राच्या ढिगार्‍यात तीन जण जखमी झाले. या हल्ल्यानंतर देशभरात सायरन वाजवण्यात आले आणि लोकांना ताबडतोब स्थलांतर करण्याचे आवाहन करण्यात आले. इराणच्या बहारिनवरील हल्ल्यात मुहर्रक शहरातील एका विद्यापीठाच्या इमारतीचेही नुकसान झाले. इराणने कुवेतवर केलेल्या हल्ल्यात सामाजिक सुरक्षा संस्थेच्या सुमारे 22 मजली इमारतीला आग लागली. इराणच्या इस्लामिक रिव्हॉल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने असा दावा केला आहे की, त्यांनी कुवेतच्या अल-अदिरी हवाई तळावर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यात अमेरिकेचे हेलिकॉप्टर दुरुस्ती केंद्र, इंधन टाक्या आणि कमांड सेंटरला लक्ष्य करण्यात आले. हल्ल्यानंतर हवाई तळावर मोठी आग लागली आणि दूरवरून काळा धूर निघतानादिसत होता.


दुसर्‍या बाजूला इस्रायल-अमेरिकेने इराणवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन यांचा वर्षाव सुरूच ठेवला.  इस्रायलने इराणमधील तेल साठवणूक आणि रिफायनरी सुविधांवर हवाई हल्ले केले. त्यात 30 इराणी इंधन टाक्या आणि तीन तेल डेपोंना आग लागली. ही आग इतकी मोठी होती की, तिचे लोळ दूरवरूनही दिसत होते. तेहरानमधील तेल साठवण सुविधांवर झालेल्या हल्ल्यांनंतर, शहरातील नाल्यांमध्ये तेल सांडले. त्यामुळे रस्त्याच्या कडेलाही आगीच्या ज्वाळा दिसत होत्या.  तर नजफाबाद शहरात अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या दुहेरी क्षेपणास्त्र हल्ल्यात 20 हून अधिक जण ठार झाले आणि सुमारे 50 जण जखमी झाले. इस्रायली लष्कराने इराणच्या इस्फहान विमानतळावर हल्ला केल्याचाही दावा केला. त्यात अनेक एफ-14 लढाऊ विमानांचे नुकसान झाले. याव्यतिरिक्त इराणच्या इस्फहान प्रांतातील वेगवेगळ्या शहरांत अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात किमान 11 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. युद्ध सुरू झाल्यापासून इराणच्या एकूण 6,668 शहरांवर हल्ले झाले असून, त्यात 10,000 हून अधिक इमारतींचे नुकसान झाल्याचा दावा इस्रायलने केला. इस्रायलने आज पुन्हा लेबनॉनवरही हल्ले केले. त्यात 45 लोक ठार झाल्याचे सांगितले जात आहे. बैरूत येथील रमादा हॉटेलवर केलेल्या हल्ल्यात 9 जण जखमी झाले. दरम्यान, नॉर्वेची राजधानी ओस्लो येथील अमेरिकन दूतावासाबाहेर जबरदस्त स्फोट झाला. त्यात जीवितहानी झाली नाही. परंतु या स्फोटामुळे घबराट पसरली. दरम्यान, आज चीनने आज हे युद्ध थांबवण्याचे आवाहन केले. या युद्धाचा कुणालाच फायदा नाही. त्यामुळे ते थांबवावे, असे
चीनने म्हटले.

अदानीच्या इस्त्रायलमधील
तेल प्रकल्पावर हल्ला

इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने आज म्हटले की, इराणने काल हैफा खाडीतील बझान ग्रुप तेल शुद्धीकरण कारखान्याला (रिफायनरी) बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा वापर करून लक्ष्य केले. इराणच्या ऊर्जा क्षेत्रावर अमेरिका-इस्रायलने केलेल्या हल्ल्यांचा बदला म्हणून हा हल्ला करण्यात आला. हैफा खाडीतील ही रिफायनरी इस्रायलमधील सर्वात मोठे तेल प्रक्रिया केंद्र आहे. इस्रायलच्या देशांतर्गत इंधनाच्या सुमारे 50 ते 60 टक्के तेलपुरवठा इथूनच होतो. ही रिफायनरी भारतातील अदानी समूहाच्या मालकीची आहे.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या