WhatsApp Data Leaked : व्हॉट्सअॅप म्हणजे आता गळ्यातला ताईत झाल आहे जणू काही व्हॉट्सअॅप शिवाय जगणं मुश्कीलच आणि काही प्रमाणात खरे देखील आहे ते. आजकाल व्हॉट्सअॅप वापरत नसेल असे यूजर्स क्वचितच सापडतील. प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअॅप हे असतंच. आपल्याला जगायला ५ महत्वाच्या गोष्टी लागतात ऊन वारा पाऊस अन्न वस्त्र आणि निवारा आणि आता यात आणखीन एक गोष्ट समाविष्ट झाली आहे ती म्हणजे व्हॉट्सअॅप. हो! वाचायला थोडं हास्यास्पद वाटेल पण तुम्ही नीट विचार करून पाहिलंत कि समजेल हे कमी अधिक प्रमाणात सत्य आहे.
या माध्यमातून आपण एकमेकांच्या सतत संपर्कात असतो. पण हाच डेटा जर लीक झाला तर?, प्रत्येकाचं वैयक्तिक संभाषण तसेच बऱ्याचदा महत्वाच्या कागदपत्रांचे फोटो देखील यामध्ये असतात. पण व्हॉट्सअॅप यूजर्ससाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नोव्हेंबर २०२५ मध्ये ऑस्ट्रियाच्या व्हिएन्ना विद्यापीठातील सुरक्षा तज्ज्ञांनी व्हॉट्सअॅपच्या प्रणालीत एक गंभीर त्रुटी शोधली आहे.

या त्रुटीमुळे जगभरातील ३.५ अब्ज यूजर्सचे फोन क्रमांक आणि प्रोफाइल माहिती लीक झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. ही जगातील सर्वांत मोठी डेटा गळती मानली जाते. २०१७ पासून ह्या समस्ये बद्दल मेटाला माहीत होते. असे असले तरी ८ वर्षे ती तशीच कायम राहिली.
भारतावर याचा सर्वाधिक परिणाम –
भारतात ५० कोटीहून अधिक व्हॉट्सअॅप वापरकर्ते आहेत. त्यामुळे हा डेटा इथे लीक होण्याची सर्वांत शक्यता आहे. गेल्या महिन्यांत +९२, +८४ किंवा +६२ सारख्या परदेशी कोड्समधून व्हिडिओ कॉल्सचे प्रमाण वाढले असल्याचे समजले. डिजिटल अरेस्ट घोटाळे, पार्ट टाईम नोकरीच्या नावे फसवणूक आणि स्पॅम मेसेज देखील वाढले आहेत.
डिजिटल जगात वावरताना पूर्ण गोपनीयता अशक्य आहे. पण सावधगिरी शक्य आहे. प्रोफाइल फोटो आणि ‘अबाउट’ मध्ये ‘ऑल’ऐवजी ‘माय कॉन्टॅक्ट’ करा ज्यामुळे काही प्रमाणात सुरक्षा मिळू शकते. अनोळखी मेसेज पूर्णपणे टाळा आणि मजबूत गोपनीयता सेटिंग्जचा वापरा.









