Who is Balen Shah? : नेपाळच्या राजकीय पटलावर एका नव्या युगाची सुरुवात होताना दिसत आहे. प्रस्थापित नेत्यांना धक्का देत युवा रॅपर आणि इंजिनिअर बालेन शाह (Balendra Shah) यांनी नेपाळच्या सार्वत्रिक निवडणुकीत ऐतिहासिक मुसंडी मारली आहे. सप्टेंबर २०२५ मध्ये केपी शर्मा ओली यांचे सरकार कोसळल्यानंतर झालेल्या या पहिल्याच निवडणुकीत बालेन शाह यांचा ‘राष्ट्रिय स्वतंत्र पार्टी’ (RSP) हा पक्ष विजयाचा नवा विक्रम प्रस्थापित करण्याच्या मार्गावर आहे.
बड्या नेत्यांचा धुव्वा
नेपाळच्या निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, १६५ पैकी १४४ मतदारसंघांचे कल हाती आले आहेत. यामध्ये बालेन शाह यांचा पक्ष १०४ जागांवर आघाडीवर आहे. सर्वात मोठी खळबळ तर झापा-५ या मतदारसंघात उडाली आहे. हा मतदारसंघ माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांचा बालेकिल्ला मानला जातो.
मात्र, तिथे बालेन शाह यांनी ओलींना मागे टाकत मोठी आघाडी घेतली आहे. ६ माजी पंतप्रधानांचे भवितव्य पणाला लागलेले असताना एका राजकीय नवख्या तरुणाने या सर्वांना घाम फोडला आहे.
कोण आहेत बालेन शाह?
३५ वर्षीय बालेन शाह हे पेशाने स्ट्रक्चरल इंजिनिअर आहेत. त्यांनी भारताच्या बंगळुरू येथील विश्वेश्वरैया टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. मात्र, त्यांची खरी ओळख एक प्रसिद्ध रॅपर म्हणून होती.
२०१२ मध्ये त्यांनी ‘सडक बालक’ हे गाणे प्रसिद्ध केले होते. काठमांडूचे महापौर म्हणून त्यांनी अपक्ष निवडणूक जिंकून प्रस्थापितांना पहिला धक्का दिला होता. भ्रष्टाचार आणि खराब प्रशासनाविरुद्ध नेपाळमधील तरुणांनी जो लढा दिला, त्याचा बालेन शाह हे प्रमुख चेहरा बनले आहेत.
तरुणाईचा पाठिंबा आणि ‘बदला’चे वारे
नेपाळमध्ये गेल्या वर्षी सोशल मीडियावरील बंदीनंतर ‘झेन-झी’ (Gen Z) पिढीने मोठे आंदोलन केले होते. याच आंदोलनामुळे तत्कालीन पंतप्रधान ओली यांना राजीनामा द्यावा लागला होता. बालेन शाह यांनी या असंतोषाला राजकीय व्यासपीठ मिळवून दिले. जएका रॅपरने देशाची धुरा सांभाळणे, हे केवळ नेपाळसाठीच नाही तर संपूर्ण दक्षिण आशियासाठी कुतूहलाचा विषय ठरले आहे.










