Robert Francis Prevost | कोण आहेत नवे पोप रॉबर्ट फ्रान्सिस प्रेव्होस्ट? जाणून घ्या माहिती

Robert Francis Prevost First American Pope

Robert Francis Prevost First American Pope | रोमन कॅथोलिक चर्चच्या 2000 वर्षांच्या इतिहासात प्रथमच अमेरिकन कार्डिनल रॉबर्ट फ्रान्सिस प्रेव्होस्ट (Robert Prevost) यांची पोप म्हणून निवड झाली आहे. ते पोप लिओ चौदावा (Pope Leo XIV) या नावाने कार्यभार स्वीकारणार आहेत. पोप म्हणून निवड झाल्यानंतर नवीन नाव धारण करावे लागते.

रॉबर्ट फ्रान्सिस प्रेव्होस्ट (Robert Francis Prevost) यांची 267 वे पोप म्हणून निवड झाली आहे. पोप फ्रान्सिस यांच्या निधनानंतर पोप बनणारे पहिले अमेरिकन नागरिक ठरले आहेत.

69 वर्षीय प्रेव्होस्ट हे मूळचे अमेरिकेतील (American Pope) शिकागोजवळील डॉल्टन शहरातील आहे. त्यांनी पहिल्या भाषणात संवाद, समर्पण आणि निर्भयतेसह शांततेचा संदेश त्यांनी दिला.

प्रेव्होस्ट हे ऑर्डर ऑफ सेंट ऑगस्टीन या धार्मिक संस्थेचे सदस्य असून, त्यांनी पेरूमध्ये तब्बल 20 वर्षे मिशनरी सेवा दिली. त्यांनी 2015 ते 2023 दरम्यान चिक्लायोचे बिशप म्हणून काम पाहिले आणि त्यानंतर पोप फ्रान्सिस (Pope Francis) यांनी त्यांना 2023 मध्ये बिशप कार्यालयाचे प्रमुख म्हणून व्हॅटिकनमध्ये बोलावले. त्याच वर्षी त्यांना कार्डिनल-बिशपपदी नेमण्यात आले.

पोप लिओ XIV यांचा प्रवास – अमेरिकन मूळ, पेरूशी घट्ट संबंध

14 सप्टेंबर 1955 रोजी डॉल्टन, इलिनॉयस येथे जन्मलेले प्रेव्होस्ट यांना 1982 मध्ये धर्मगुरुपद मिळाले. त्यांनी रोममधील सेंट थॉमस अक्विनास पोंटिफिकल कॉलेज येथून कायद्यात डॉक्टरेट प्राप्त केली. त्यांचे स्पॅनिश आणि इटालियन भाषांवर प्रभुत्व असून, उत्तर आणि दक्षिण अमेरिका तसेच परंपरा आणि सुधारणा यांच्यातील एक सेतू म्हणून त्यांची ओळख आहे.

‘पोप’पदाची पारंपरिक चौकट मोडणारा नेता

इतिहासात प्रथमच अमेरिकन पोप निवडला गेला असून, याआधी अमेरिकन कार्डिनलला पोप बनवण्यास काहीसा विरोध होता, कारण अमेरिकेचे आधीच जागतिक पातळीवर मोठे राजकीय वर्चस्व आहे. मात्र, प्रेव्होस्ट हे पेरूचे नागरिक देखील आहेत आणि त्यांनी तिथे अनेक वर्षे वास्तव्यास घालवले आहेत, ज्यामुळे ही निवड शक्य झाली.

पोप फ्रान्सिस यांच्या कार्यकाळात त्यांनी ‘बिशप हा एक लहानसा राजपुत्र नसावा, तर तो जनतेच्या जवळचा, त्यांच्यासोबत चालणारा आणि दुःख वाटणारा नेता असावा’ असे विधान केले होते. याच दृष्टिकोनामुळे त्यांचा झपाट्याने उंचावलेला प्रवास चर्चमधील बदलाचा नवा अध्याय मानला जात आहे.

सेंट पीटर्स बॅसिलिकाच्या बाल्कनीतून ‘शांती असो’ असा संदेश

निवडीनंतर पोप लिओ XIV यांनी सेंट पीटर्स बॅसिलिकाच्या (St. Peter’s Basilica) बाल्कनीतून ‘Peace be with all of you’ असा भावनिक संदेश दिला. त्यांनी सांगितले, “मी ऑगस्टिनियन पंथाचा धर्मगुरू आहे, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे मी ख्रिस्ती आहे आणि बिशप आहे – आपण सर्वांनी एकत्र चालले पाहिजे.”

आपले पहिले भाषण त्यांनी इटालियनमध्ये दिले आणि नंतर स्पॅनिशमध्ये, पेरूमधील त्यांच्या वर्षानुवर्षांच्या सेवांचा उल्लेख करत त्यांनी आपली भूमिकाही स्पष्ट केली. नवीन पोप म्हणून निवड झाल्यानंतर जगभरातून प्रेव्होस्ट यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.