Nimisha Priya Execution in Yemen | केरळच्या 38 वर्षीय नर्स निमीषा प्रियाला (Nimisha Priya) येमेनमध्ये (Yemen) 16 जुलै 2025 रोजी फाशी दिली जाण्याची शक्यता वाढली आहे. 2017 मध्ये एका स्थानिक व्यावसायिकाच्या हत्येप्रकरणी तिला ही शिक्षा सुनावण्यात आली होती.
आता भारत सरकारच्या सर्व प्रयत्नांना यश मिळाले नसल्याने तिची सुटका अशक्य वाटत आहे. सर्वोच्च न्यायालयात याबाबत सुनावणी पार पडली. यावेळी भारत सरकार ‘फार काही करू शकत नाही’ वकिलांनी सांगितले. भारत सरकारचे आतापर्यंतचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले आहेत. सरकार निमीषा प्रियाला वाचवण्यासाठी काहीच का करू शकत नाही? याबाबत जाणून घ्या.
निमीषा प्रियाला वाचण्यासाठी सरकारचा प्रयत्न
निमीषा प्रियावर येमेनच्या साना शहरातील तिच्या व्यावसायिक भागीदार तलल अब्दो महदी याच्या हत्येचा आरोप ठेवण्यात आला होता. भारताचे ॲटर्नी जनरल आर. वेंकटरमणी यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, तिच्या जीव वाचवण्यासाठी शक्य तितके प्रयत्न केले गेले. यासाठी भारताने येमेनमधील एका प्रभावी शेखशी संपर्क साधला होता, ज्याच्या माध्यमातून फाशी स्थगित करण्याची विनंती करण्यात आली.
“आम्हाला एक अनौपचारिक संदेश मिळाला होता की फाशी पुढे ढकलली जाऊ शकते, पण त्याची खात्री नाही,” असे त्यांनी नमूद केले. हौथी बंडखोर गटाशी भारताचे औपचारिक राजनैतिक संबंध नसल्याने ही प्रक्रिया आणखी गुंतागुंतात सापडली आहे, कारण साना हे शहर त्यांच्या नियंत्रणाखाली आहे.
ब्लड मनीचा पर्याय नाकारला
शरिया कायद्यानुसार, हत्येप्रकरणी पीडित कुटुंब माफी देऊ शकते, जर त्यांना आर्थिक नुकसानभरपाई म्हणून ‘ब्लड मनी’ दिली गेली आणि ती स्वीकारली गेली. ‘सेव्ह निमीषा प्रिया इंटरनॅशनल ॲक्शन कौन्सिल’ने यासाठी प्रयत्न केले असून, निमीषाच्या कुटुंबाने पीडित कुटुंबाला चांगली रक्कम ऑफर केली होती.
पण पीडित कुटुंबाने आणि हौथी अधिकाऱ्यांनी यात सहभाग नाकारल्याने हा मार्गही बंद झाला. ॲटर्नी जनरल म्हणाले, “ते सन्मानाचा प्रश्न मानतात, आणि अधिक पैशानेही स्थिती बदलेल की नाही हे साशंक आहे. सध्या सर्व काही थांबले आहे.”
न्यायालयाची चिंता
न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि संदीप मेहता यांच्या खंडपीठाने या प्रकरणात विचारले की, “आम्ही परदेशी राष्ट्राला कसा आदेश देऊ शकतो? त्याचे पालन कोण करणार?” ‘सेव्ह निमीषा प्रिया’ गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने सरकारला परिस्थितीवर प्रकाश टाकण्यास सांगितले. या प्रकरणाची पुढील सुनावणी 18 जुलै 2025 रोजी होण्याची शक्यता आहे.
निमीषावर हत्येचा आरोप
निमीषा प्रिया ही पलक्कड, केरळ येथील एक नर्स आहे. 2008 मध्ये ती जास्त पगारासाठी येमेनला गेली, कारण तिचे आई-वडील रोजंदारीवर काम करत होते. तिने अनेक रुग्णालयांमध्ये नोकरी केल्यानंतर स्वतःचा दवाखाना सुरू केला. स्थानिक भागीदाराची गरज असल्याने तलल अब्दो महदी तिचा भागीदार बनला.
निमीषाने आरोप केला की, महदी तिला छळायला लागला, ज्यामुळे तिने त्याला शामक औषधे देऊन त्याचा पासपोर्ट परत मागितला. पण औषधाचा डोस जास्त झाल्याने त्याचा मृत्यू झाला. 2020 मध्ये साना कोर्टाने तिला फाशीची शिक्षा सुनावली, जी हौथींच्या सुप्रीम ज्युडिशियल कौन्सिलने 2023 मध्ये कायम ठेवली होती.
निमीषाचे 2011 मध्ये एका मल्याळी व्यक्तीशी लग्न झाले आणि त्यांना एक मुलगी आहे. आर्थिक अडचणींमुळे तिचा पती आणि मुलगी 2014 मध्ये भारतात परतले होते. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये तिची आई प्रेमा कुमारी यांनी येमेनला जाऊन माफी मागण्याचा प्रयत्न केला होता त्या तुरुंगात निमीषाला भेटल्या, पण युद्धग्रस्त परिस्थितीमुळे मदत मिळणे कठीण झाले आहे.