US Military Operation Venezuela : जगाच्या राजकारणात आज एक अत्यंत मोठी आणि धक्कादायक लष्करी घडामोडी घडली आहे. अमेरिकेने व्हेनेझुएलावर थेट लष्करी हल्ला चढवून तेथील राष्ट्राध्यक्ष निकोलस मदुरो यांना त्यांच्या पत्नीसह ताब्यात घेतले आहे. या कारवाईनंतर संपूर्ण दक्षिण अमेरिकेत खळबळ उडाली असून जागतिक स्तरावर याचे तीव्र पडसाद उमटत आहेत.
अमेरिकेने व्हेनेझुएलावर हल्ला का केला?
या ऐतिहासिक लष्करी कारवाईसाठी अमेरिकेने प्रामुख्याने 3 महत्त्वाची कारणे दिली आहेत:
- अमली पदार्थांची तस्करी आणि नार्को-टेररिझम: अमेरिकेनुसार, निकोलस मदुरो हे स्वतः एका मोठ्या गुन्हेगारी टोळीचे नेतृत्व करत असून अमेरिकेत होणाऱ्या कोकेन आणि फेंटानिलच्या तस्करीमागे त्यांचा हात आहे.
- बेकायदेशीर घुसखोरी: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आरोप केला आहे की, मदुरो यांनी मुद्दाम आपल्या देशातील तुरुंगांमधील कैद्यांना मोकळे करून त्यांना अमेरिकेच्या सीमेवर पाठवले आहे.
- राष्ट्रीय सुरक्षा: व्हेनेझुएलातील गुन्हेगारी टोळ्या अमेरिकेच्या अंतर्गत सुरक्षेसाठी मोठा धोका बनल्याचे वॉशिंग्टनचे म्हणणे आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया
या कारवाईची माहिती देताना डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत आक्रमक भूमिका मांडली. ट्रम्प म्हणाले की, “मी 1 आठवड्यापूर्वीच मदुरो यांना इशारा दिला होता की तुम्ही स्वतःहून पद सोडा आणि शरण या. पण त्यांनी ऐकले नाही. शेवटी आम्हाला ही शक्तिशाली आणि सर्जिकल मोहीम राबवावी लागली. आगामी काळात व्हेनेझुएलाच्या तेल उद्योगात अमेरिका महत्त्वाची भूमिका बजावेल.” त्यांनी लष्कराच्या नियोजनाचे आणि जवानांच्या धैर्याचेही कौतुक केले.
उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. वान्स काय म्हणाले?
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. वॅन्स यांनीही या कारवाईचे समर्थन करत ‘X’वर आपली प्रतिक्रिया दिली. वॅन्स म्हणाले की, “राष्ट्राध्यक्षांनी या संकटातून बाहेर पडण्यासाठी अनेक मार्ग दिले होते, पण आमची अट स्पष्ट होती, अमली पदार्थांची तस्करी थांबवा आणि चोरलेले तेल अमेरिकेला परत करा. ट्रम्प जे म्हणतात ते करून दाखवतात, हे आता मदुरो यांना समजले असेल. आमच्या शूर विशेष सैनिकांनी ही अत्यंत प्रभावी मोहीम फत्ते केली आहे.”
कशी पार पडली ही धाडसी मोहीम?
अमेरिकन लष्कराच्या अत्यंत कार्यक्षम ‘डेल्टा फोर्स’ने ही कारवाई यशस्वी केली. काराकासमधील ला कार्लोटा लष्करी तळ आणि फुएर्ते तिउना या तळांवर पहाटे 2 वाजता स्फोट झाले. त्यानंतर अवघ्या 30 मिनिटांच्या आत ही मोहीम पूर्ण करण्यात आली. ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वर माहिती दिली की, मदुरो यांना आता अमेरिकेत आणले असून त्यांच्यावर गुन्हेगारी खटले चालवले जातील.
व्हेनेझुएलाची प्रतिक्रिया
मदुरो यांच्या अटकेनंतर व्हेनेझुएलाच्या उपराष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी याला ‘साम्राज्यवादी आक्रमण’ म्हटले आहे. त्यांनी मदुरो यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली असून ‘प्रूफ ऑफ लाईफ’ची मागणी केली आहे. देशात आणीबाणी घोषित करण्यात आली असून समर्थकांना रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले आहे.
या कारवाईमुळे जागतिक राजकारणात खळबळ उडाली असून रशिया आणि इराणसारख्या देशांनी अमेरिकेच्या या पाऊलाचा निषेध केला आहे. आता व्हेनेझुएलाची सत्ता कोणाकडे जाणार आणि कच्च्या तेलाच्या किमतींवर याचा काय परिणाम होणार, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, काराकासमध्ये पहाटेच्या वेळी झालेल्या या स्फोटांनंतर आणि राष्ट्राध्यक्षांच्या अटकेनंतर व्हेनेझुएलामध्ये सध्या प्रचंड तणाव आहे. अमेरिकेने मदुरो यांना देशाबाहेर नेले असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या हल्ल्यांनंतर व्हेनेझुएलात आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.









