Bihar News | बिहारमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका (Bihar Election) होणार आहे. सध्या बिहारमध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणावरून वाद पेटला आहे. त्यातच आता एक विचित्र प्रकार समोर आला असून, एका महिलेच्या मतदान ओळखपत्रावर चक्क बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांचा फोटो छापण्यात आला आहे.
बिहारच्या मधेपुरा जिल्ह्यातील एका महिलेच्या मतदार ओळखपत्रावर तिच्या ऐवजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा फोटो छापल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे हा गोंधळ उडाला असून, यामुळे बिहारमधील निवडणूक यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
महिलेचे नाव आणि पत्ता बरोबर असताना फोटो चुकल्याने तिच्या पतीने याची चौकशीची मागणी केली आहे. एकीकडे मतदारयाद्यांच्या विशेष तपासणी प्रक्रियेवरून बिहार बंद आणि निवडणूक आयोगाविरोधातील निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर हे प्रकरण चर्चेत आहे.
काय आहे प्रकरण?
मधेपुरा शहरातील जयपालपट्टी परिसरातील या महिलेच्या मतदार ओळखपत्रावर मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा फोटो छापला गेला. महिलेचा पती चंदन कुमार यांनी हे ओळखपत्र मीडियासमोर सादर करत निवडणूक आयोगाच्या गंभीर चुकीबाबत माहिती दिली.
अडीच महिन्यांपूर्वी पोस्ट ऑफिसमार्फत आलेल्या कार्डावर नाव, पत्ता बरोबर होते, पण फोटो नितीश कुमार यांचा होता. चंदन यांनी बीएलओकडे तक्रार केली असता, त्यांना गप्प राहण्याचा व कोणालाही याबाबत माहिती न देण्यास सांगितले. सल्ला मिळाला.
चंदन यांनी प्रश्न उपस्थित केला की, सामान्य व्यक्तीऐवजी थेट मुख्यमंत्र्यांचा फोटो कार्डवर येणे हा निवडणूक आयोगाचा निष्काळजीपणा दर्शवतो. उप-निर्वाचन अधिकारी जितेंद्र कुमार यांनी सांगितले की, मतदार ओळखपत्र कर्नाटकात बनतात आणि फॉर्म आठ भरून सुधारणा शक्य आहे. या प्रकरणाने बिहारमधील मतदार यादी पुनरीक्षणाच्या प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह उभे केले आहे.