नवी दिल्ली – केंद्रीय निवडणूक आयोगाकडून बिहारमध्ये (Election Commission in Bihar)केल्या जात असलेल्या मतदार यांद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणावरून (सर) देशभर गदारोळ सुरू असताना सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव (Yogendra Yadav t)यांनी आज बिहारमधील अशा दोन मतदारांना सर्वोच्च न्यायालयात हजर केले की ज्यांची नावे निवडणूक आयोगाने मृत असा शिक्का मारून यादीतून काढून टाकली आहेत.
योगेंद्र यादव यांनी निवडणूक आयोगाच्या एसआयआरला याचिकेद्वारे(petition) आक्षेप घेतला आहे. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान यादव यांनी न्या. सूर्यकांत (Justice Surya Kant) आणि न्या. ज्योयमाल्या बागची (Justice Joymalya Bagchi.) यांच्या खंडपीठासमोर या दोन मतदारांना हजर केले.
निवडणूक आयोगाचे वकील ज्येष्ठ विधिज्ञ राकेश द्विवेदी (Rakesh Dwived)यांनी यादव यांच्या या कृतीची नाटकीपणा अशा शब्दांत संभावना केली. मतदार यादीत काही चुका असतील तर यादव यांना आयोगासमोर मांडून दुरुस्त करून घेता आल्या असत्या. त्यासाठी न्यायालयात येण्याची गरज नव्हती,असे द्विवेदी म्हणाले.यादव यांनी आयोगाने मतदार याद्यांमध्ये केलेल्या अनेक चुका न्यायालयासमोर मांडल्या. त्या न्यायालयाने सुनावणीस योग्य असल्याचे म्हटले आहे.