Ukraine Russia War : युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाला लवकरच ४ वर्षे पूर्ण होत असतानाच, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर नाव न घेता अत्यंत तीव्र शब्दांत टीका केली आहे.
ख्रिसमसच्या निमित्ताने दिलेल्या व्हिडिओ संदेशात झेलेन्स्की यांनी युक्रेनच्या जनतेच्या मनातील भावना व्यक्त करताना पुतिन यांच्या मृत्यूची सुप्त इच्छा बोलून दाखवली. रशियाने ख्रिसमसच्या काळातही युक्रेनवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनच्या साह्याने भीषण हल्ले केल्याने झेलेन्स्की संतापले होते.
‘त्याचा मृत्यू होवो’ – झेलेन्स्कींचा प्रहार
झेलेन्स्की म्हणाले की, रशियाने कितीही यातना दिल्या किंवा बॉम्बफेक केली, तरी ते आमचे युक्रेनी हृदय, आमचा एकमेकांवरील विश्वास आणि आमची एकता हिरावून घेऊ शकत नाहीत.
पुतिन यांचे थेट नाव न घेता ते पुढे म्हणाले, “आज आपल्या सर्वांचे एकच स्वप्न आहे आणि प्रत्येकाच्या ओठावर एकच इच्छा आहे – ‘त्याचा अंत होवो’. आम्ही देवाकडे युक्रेनसाठी शांतता मागत आहोत, ज्यासाठी आम्ही लढत आहोत आणि ज्याचे आम्ही हक्कदार आहोत.”
युद्ध संपवण्यासाठी २० कलमी प्लॅन
केवळ टीका करून न थांबता झेलेन्स्की यांनी पत्रकारांशी बोलताना युद्ध संपवण्यासाठी एक २० कलमी आराखडा सादर केला. यामध्ये त्यांनी प्रथमच काही मोठ्या तडजोडींचे संकेत दिले आहेत:
- डॉनबास क्षेत्रातून माघार: युक्रेन आपल्या पूर्वेकडील औद्योगिक केंद्र असलेल्या डॉनबास भागातून सैन्य मागे घेण्यास तयार आहे. मात्र, रशियानेही आपले सैन्य मागे घेऊन हा भाग ‘लष्करी मुक्त क्षेत्र’ घोषित करावा आणि तिथे आंतरराष्ट्रीय दलांचे नियंत्रण असावे, अशी अट त्यांनी घातली आहे.
- झॅपोरिझिया अणुऊर्जा प्रकल्प: सध्या रशियाच्या ताब्यात असलेल्या या प्रकल्पाच्या परिसरासाठी देखील अशाच प्रकारची व्यवस्था केली जाऊ शकते.
- लोकमत चाचणी: झेलेन्स्की यांनी स्पष्ट केले की, कोणताही शांतता करार अंतिम करण्यापूर्वी युक्रेनच्या जनतेची ‘रेफरेंडम’ म्हणजेच लोकमत चाचणी घेतली जाईल.
रशिया आणि अमेरिकेची भूमिका
रशियाने अद्याप झेलेन्स्की यांच्या या प्रस्तावावर कोणतीही सकारात्मक प्रतिक्रिया दिलेली नाही. रशियाने सध्या लुहान्स्कचा बहुतांश भाग आणि डोनेस्तकचा ७० टक्के भाग ताब्यात घेतला आहे.
दुसरीकडे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मांडलेल्या शांतता योजनेनंतर अमेरिकन वाटाघाटीकार रशिया आणि युक्रेनशी स्वतंत्रपणे चर्चा करत आहेत. ट्रम्प यांची योजना रशियाच्या बाजूने झुकलेली असल्याचे मानले जात असल्याने, युक्रेन आणि युरोपियन देश त्यामध्ये बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहेत.









