श्रीनगर- भारतीय लष्कराने आज जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरच्या हरवानमधील लिडवास परिसरात ऑपरेशन महादेव मोहिमेत यश मिळवत पहलगाम हल्ला करणाऱ्या दोघा दहशतवाद्यांना ठार केले. मुसा सुलेमानी व अबू यासीर यांना लष्कराने मारले.
ऑपरेशन महादेव गेले काही दिवस सुरू आहे. दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला 20 लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. त्यांचा शोध घेताना सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली. सुरक्षा दलाच्या जवानांनी दहशतवाद्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले. यावेळी सुरक्षा दलाला 4 दहशतवादी दिसले, त्यातील तीन जणांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले तर एक दहशतवादी पळून गेला. मारलेल्या दहशतवाद्यांमधील हाशिम मुसा सुलेमानी आणि अबू हमजा यासिर हे दोघे पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी होते. ही माहिती भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सने दिली.
याबाबत भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, गुप्तचर यंत्रांना माहिती मिळाल्यानंतर आज सकाळी ऑपरेशन महादेवअंतर्गत पोलीस, लष्कराचे जवान आणि केंद्रीय राखीव सुरक्षा दलाचे जवान यांच्या संयुक्त पथकाने महादेव डोंगरावरील मुलनारच्या जंगल परिसरात घेराव घातला आणि शोधमोहीम हाती घेतली. पहलगामपासून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या लिडवास येथे सुरक्षा दलाचे जवान पोहोचल्यानंतर तेथे दडून बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्याला सुरक्षा दलाच्या जवानांनी प्रत्युत्तर दिले. जवान आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार गोळीबार झाला. यात तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. यातील दोघांची ओळख पटली असून, ते 24 एप्रिल 2022 मध्ये पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यातील दहशतवादी असल्याचे उघड झाले आहे. एक अतिरेकी फरार असून, एका ठार झालेल्या अतिरेक्याची ओळख पटलेली नाही. सुरक्षा दलाला या दहशतवाद्यांकडून अमेरिकन बनावटीचे एम4 कार्बाईन, एके-47, 17 रायफल ग्रेनेड सापडले आहेत. याशिवाय, इतर अनेक संशयास्पद वस्तू देखील जवानांनी जप्त केल्या आहेत. याठिकाणी सुरक्षा दलांच्या जवानांची संख्या वाढवण्यात आली आहे.
लष्कराने ठार केलेला हाशिम मुसा सुलेमानी हा पाकिस्तानच्या स्पेशल सर्व्हिस ग्रुपमध्ये होता. त्यानंतर तो लष्कर-ए-तोएबा या दहशतवादी संघटनेत गेला. 2023 साली तो भारतात घुसला. भारतात अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये तो सक्रिय होता. पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांचे बळी गेले होते आणि त्यामागे मुसाचे नियोजन असल्याचे गुप्तचर यंत्रणांनी सांगितले आहे. त्याच्यावर 20 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.
