राकेश शर्मानंतर 41 वर्षांनी शुभांशू शुक्लाची झेप! अंतराळ स्थानकावर जाणारा पहिला भारतीय! 14 दिवस मुक्काम

फ्लोरिडा- भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज ॲक्सियम मिशन-4 अंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठी (आयएसएस) रवाना झाले. हे मिशन गेले अनेक दिवस वेगवेगळ्या कारणांनी सहा वेळा पुढे ढकलण्यात आले होते. आज ते यशस्वीरीत्या अंतराळात झेपावले. 1984 मध्ये राकेश शर्मा अंतराळात गेल्यानंतर सुधांशू शुक्ला हे अंतराळात जाणारे दुसरे भारतीय आहेत. तर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणारे ते पहिलेच भारतीय अंतराळवीर आहेत. पुढील चौदा दिवस आंतरराष्ट्रीय अंतराळात राहून ते अनेक प्रयोग करणार आहेत. त्यांचा अंतराळ प्रवास ही भारतासाठी एक मोठी झेप समजली जात आहे.
भारतीय वेळेनुसार दुपारी 12.00 वाजता फ्लोरिडा येथील नासाच्या केनेडी स्पेस सेंटर येथून हे मिशन लाँच करण्यात आले. सर्व अंतराळवीरांनी स्पेसएक्सच्या फाल्कन-9 रॉकेटला जोडलेल्या ड्रॅगन कॅप्सूलमधून उड्डाण केले. ड्रॅगन अंतराळयान सुमारे 28.30 तासांनंतर 26 जून रोजी दुपारी 4.30 वाजता आयएसएसशी जोडले जाईल. त्यांच्यासोबत अमेरिकेचे कमांडर पेगी व्हिटसन, पोलंडचे सॉवॉस उझनॅन्स्की आणि हंगेरीचे तिबोर कूपर हे आणखी तीन अंतराळवीर आहेत. व्हिटसन हे या मिशनचे प्रमुख आहेत, तर सुधांशू शुक्ला हे पायलट आहेत. शुक्ला यांचे यान अवकाशात स्थिरावल्यानंतर फॉल्कन-9 हे रॉकेट सुरक्षितपणे पृथ्वीवर परतले आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्राशी जोडण्यासाठी या यानाला 28 तास लागणार आहेत. त्यापूर्वी पुढील 24 तासांत हे यान पृथ्वीला 16 वेळा प्रदक्षिणा घालणार आहे. त्यामुळे एका दिवसांत हे अंतराळवीर 16 वेळा सूर्योदय व 16 वेळा सूर्यास्त पाहतील.
अंतराळात प्रवेश करताच सुधांशू शुक्ला यांनी पहिला मेसेज पाठवला. त्यात त्यांनी म्हटले की, 41 वर्षांनंतर आपण पुन्हा अंतराळात पोहोचलो आहोत. हा एक अद्भूत प्रवास होता. सध्या आम्ही साडे सात किलोमीटर प्रतिसेकंदाच्या वेगाने पृथ्वीभोवती फिरत आहोत. माझ्या खांद्यावर माझा तिरंगा आहे. जो मला आठवण करून देत आहे की, या प्रवासात मी एकटा नाही. तुम्ही माझ्यासोबत आहात. ही केवळ माझी एकट्याची आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठीच्या प्रवासाची सुरुवात नाही, तर भारताची मानवी अंतराळ कार्यक्रमाची सुरुवात आहे. माझी इच्छा आहे की, सर्व भारतीयांनी या मोहिमेचा सहभागी व्हावे. आपण सर्वजण मिळून भारताच्या ह्युमन स्पेस प्रोग्रामची सुरुवात करुया.
अमेरिकन अंतराळ संस्था नासा आणि भारतीय संस्था इस्रो यांच्यातील करारानुसार, भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन असलेल्या शुभांशू शुक्ला यांची या मोहिमेसाठी प्राइम अस्ट्रॉनॉट (प्रमुख अंतराळवीर) म्हणून निवड झाली आहे. शुभांशू हे उत्तर प्रदेशातील लखनौ येथील आहेत. त्यांनी राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) मधून शिक्षण घेतले आहे. 2006 मध्ये ते हवाई दलात सामील झाले. त्यांना लढाऊ विमाने उडवण्याचा अनुभव आहे. विशेष म्हणजे, इस्रोच्या गगनयान मोहिमेसाठीही त्यांची निवड झाली आहे. ही भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम आहे. अंतराळवीर होण्यासाठी त्यांनी रशिया आणि अमेरिकेत विशेष प्रशिक्षण घेतले. ॲक्सियम मिशन -4 मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट अंतराळात संशोधन करणे आणि नवीन तंत्रज्ञानाची चाचणी करणे हे आहे. खाजगी अंतराळ प्रवासाला प्रोत्साहन देणे आणि भविष्यात व्यावसायिक अंतराळ स्थानक (ॲक्सियम स्टेशन) बांधण्याच्या योजनेचा अभ्यास हाही या मोहिमेचा एक भाग आहे. याशिवाय सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात विविध प्रयोग, अवकाशात नवीन तंत्रज्ञानाची चाचणी आणि विकास विविध देशांतील अंतराळवीरांना व्यासपीठ उपलब्ध करणे. अवकाशातून पृथ्वीवरील लोकांना प्रेरणा देणे आणि जागरूकता पसरवणे या दृष्टीनेही या मोहिमेकडे पाहिले
जात आहे.
शुभांशू आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानका 14 दिवस तिथे राहतील. या काळात ते अंतराळातील मानवी आरोग्यावर आणि जीवांवर होणारा परिणाम तपासणे यासारखे सात प्रयोग करतील. ते दीर्घ अंतराळ मोहिमांसाठी डेटा गोळा करतील. शुभांशू यांनी आपल्यासोबत आंब्याचा रस, गाजराचा हलवा आणि मुगडाळीचा हलवा अंतराळात नेला आहे, असे त्यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
आई-वडिलांना आनंदाश्रू अनावर
शुभांशू शुक्ला यांचे मिशन लाँच होताना त्यांचे आई-वडीलदेखील तिथे उपस्थित होते. यावेळी त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले होते. त्यांचा उर अभिमानाने भरून आला होता. या क्षणांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पत्नीचे विशेष आभार
शुभांशू यांनी अंतराळात जाण्यापूर्वी इन्स्टाग्रामवर आपली पत्नी कामनाचा एक फोटो पोस्ट करत लिहिले की, आयुष्याच्या प्रवासातील माझी अद्भूत भागीदार असलेल्या कामना शुक्लाचे विशेष आभार. तुझ्याशिवाय हे काहीच शक्य नव्हते आणि तू नसतीस तर या कशालाच अर्थ नसता.