पाटणा – बिहारमध्ये नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. नेत्यांनी बेफाम घोषणा करण्यास सुरुवात केली आहे. बिहारचे मुख्यमंत्री आणि जदयूचे अध्यक्ष नितीशकुमार यांनी आता 125 युनिटपर्यंत सर्वांना वीज मोफत देण्याची घोषणा केली आहे. ही योजना 1 ऑगस्ट 2025 पासून लागू होणार. जुलै महिन्याच्या वीज बिलापासूनच नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे. राज्याची आर्थिक स्थिती पूर्ण डळमळीत झाली तरी चालेल, पण निवडणूक जिंकण्यासाठी ही योजना जाहीर केली आहे.
नितीशकुमार यांनी सोशल मीडियावरून या निर्णयाची घोषणा करताना सांगितले की, आम्ही सुरुवातीपासूनच सर्वांना स्वस्त दरात वीज पुरवत आहोत. आता आम्ही निर्णय घेतला आहे की, 1 ऑगस्ट 2025 पासून म्हणजेच जुलै महिन्याच्या बिलात राज्यातील सर्व घरगुती ग्राहकांना 125 युनिटपर्यंतच्या विजेसाठी पैसे द्यावे लागणार नाहीत. एकूण 1 कोटी 67 लाख कुटुंबांना याचा फायदा होईल. आम्ही असेही ठरवले आहे की, पुढील तीन वर्षांत या सर्व घरगुती ग्राहकांना त्यांची संमती घेऊन त्यांच्या घरांच्या छतावर किंवा जवळच्या सार्वजनिक ठिकाणी सौरऊर्जा यंत्रणा बसविली जाईल. कुटीर ज्योती योजनेअंतर्गत, अत्यंत गरीब कुटुंबांसाठी सौरऊर्जा यंत्रणा मोफत बसवून दिली जाईल. यामुळे, घरगुती ग्राहकांना आता 125 युनिटपर्यंतच्या विजेसाठी काहीही खर्च करावा लागणार नाही आणि पुढील तीन वर्षांत राज्यात 10 हजार मेगावॅटपर्यंत सौरऊर्जा उपलब्ध होईल.
