ईएलएसएस (ELSS) या गुंतवणूक पर्यायात करबचतीचा लाभ तर मिळतोच त्याचबरोबर इक्विटी प्रकारातील गुंतवणुकीचा फायदा होत मोठी रक्कमदेखील उभी राहते. आज आपण ईएलएसएसमधील गुंतवणूक आणि त्याचे फायदे जाणून घेऊया.
ईएलएसएस म्हणजे इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्स स्कीम फंड. हा एक म्युच्युअल फंडाचाच एक प्रकार आहे. ईएलएसएसमध्ये केलेल्या गुंतवणुकीमध्ये, कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंत कर वजावटीचा लाभ मिळतो. ईएलएसएसमध्ये दीर्घकालावधीसाठी एसआयपीद्वारे गुंतवणूक केल्यास करवजावटीचा लाभ तर मिळतोच मात्र हा इक्विटी प्रकार असल्यामुळे दीर्घकाळात यातून मोठी रक्कम उभी राहते.अर्थात यात इक्विटीची जोखीमदेखील असतेच. मात्र दीर्घकाळात गुंतवणूक केल्यास हा धोका कमी होतो. शिवाय मागील काही वर्षात ईलएसएस योजनांनी चांगला परतावा दिला आहे. त्यामुळे हा काही फक्त कर बचतीचा पर्याय नव्हे. तर यातून तुम्ही भविष्यात मोठा आर्थिक लाभ मिळवू शकता.
ईएलएसएसमध्ये गुंतवणूकदारांना SIP द्वारे किंवा एकरकमी अशा दोन्ही प्रकारे गुंतवणूक करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. तज्ञांच्या मते तुलनेने कमी लॉक-इन कालावधी, भांडवल वाढीची क्षमता किंवा संपत्ती निर्मितीची क्षमता आणि कर लाभ यामुळे अलीकडच्या काळात ELSS हा कर बचत गुंतवणुकीच्या संदर्भात गुंतवणुकदारांच्या पसंतीच्या पर्यायांपैकी एक बनला आहे. ELSS ही सर्वात लोकप्रिय इक्विटी म्युच्युअल फंड श्रेणींपैकी एक असून अलीकडच्या या प्रकारात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे.