थोडं थांबा, मार्च एंडिंग आहे…!

हा महिना म्हणजेच सगळ्यांचाच मार्च एंडिंगचा महिना. बँक कर्मचारी असो वा खासगी कंपनीतील कामगार, सा-यांसाठीच हा महिना म्हणजे अक्षरशः लगीनघाई. कामाचे तास आणि महिन्याचे शनिवार-रविवार हे मोजणं तर दूरच, त्यांची आठवण करून नियोजन करण्याचीही सोय नसलेला हा महिना. कामावरून घरी येणं उशीराचं. महिन्याचे 31 दिवसही आठवडा भासावा असे.

कुणाला हिशेब पूर्ण करायचा असतो. कुणाला नव्या आर्थिक वर्षाची तयारी. तर कुणाला वर्ष सरता सरता लक्ष्य गाठायचं असतं. थर्टीफर्स्टची (मार्चची बरं, इयरएंडची नव्हे) डेडलाईन अगदी गळ्याशी आलेली असते. वर्षभरासाठी आखलेलं, निश्चित केलेलं, अपेक्षित, राहिलेलं टार्गेट पूर्ण करायचं ते या शेवटच्या काही दिवसात. सगळीच आणि सगळ्यांचीच तारेवरची कसरत. तर असा हा मार्च. व्यक्तिगतासाठी, शासन विभागासाठी, खासगी कंपन्यांसाठी, सरकारसाठी खूपच महत्त्वाचा. सकाळी काम सुरू केल्यानंतर रात्र कशी होते, दरम्यान दुपार, संध्याकाळ कधी येऊन गेली याचाही पत्ता नसतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा नववा आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा चौथा अर्थसंकल्प महिन्याभरापूर्वी सादर झाला.

येत्या पंधरवड्यानंतर सुरू होणार्‍या आर्थिक वर्ष 2022-23 ची तयारी, तजवीज असं सारं काही या अर्थसंकल्पात आहे. आधीच्या वित्त वर्षात पूर्ण न होऊ शकणारी उद्दिष्ट्ये येत्या वर्षात पूर्ण करण्यासह त्याला नवी जोडही देण्यात आली आहे. अर्थविषयक, तिजोरीशी संबंधित आकडेही विस्तारण्यात आले आहेत. मात्र पुढे जाताना मागच्याची पुनरावृत्ती, उजळणी करायची नसली तरी काहींच्या आधारावरच नव्या वर्षाची अवलंबिता आहे. विकास दर अद्याप रुळावर न आलेला आपण पाहिला. महागाईचा फुगा फुगतच आहे. त्यात आता अल्प बचत योजना, ईपीएफसारख्या स्थिर उत्पन्न देणा-या गुंतवणूक पर्यायावरील व्याजही कमी होत आहे.

याउलट कर्जावरील व्याज वाढणार आहे. उत्पन्नाचे स्रोत अद्याप रुळले नसले तरी त्यांचा ओघ रोडावणार आहे. अशा स्थितीत माय-बाप सरकार काय आणि तुम्ही – आम्ही काय, सार्‍यांनाच नव्या आर्थिक वर्षाचं नियोजन अधिक सजगतेनं करावं लागणार आहे. खर्च आणि उत्पन्न हे डोळ्यात तेल घालून पाहावं लागणार आहे. बचत आणि गुंतवणूक याची सांगड घालावी लागेल.

नवं वित्त वर्ष सुरू झालं की मात्र नियोजनाची अंमलबजावणी करावी लागणार आहे. आतासारखं अगदी मार्च एंडिंगपर्यंत राहिलेलं आटपायचं, असं करून चालणार नाही. कारण आगामी काळ आव्हानात्मक आहे. कल करे सो आज, या उक्तीप्रमाणे जगावं लागेल. वागावं लागेल. कोरोना-लॉकडाऊननं अ‍ॅक्झिट घेतांना वर्षं लावली. रशिया-युक्रेनसारखे घटक वाढू शकतात. तेव्हा सज्ज राहा…

Scroll to Top