दोन हजारांच्या नोटा चलनातून गायब, कारण काय?

नोटाबंदीनंतर भारतात दोन हजारांच्या नोटा चलनात आल्या होत्या. मात्र, आता या नोटा बाजारातून हद्दपार झाल्या आहेत. पाच राज्यांत विधानसभा निवडणुका सुरू असल्याने दोन हजारांच्या नोटांची जमाखोरी सुरू असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, दोन हजारांच्या नोटांची छपाई 2020 पासून बंद करण्यात आली आहे. त्यामुळे दोन हजाराच्या नोटा गायब झाल्या असण्याची शक्यता आहे.

वित्तीय वर्ष 2020 पासून देशात दोन हजाराच्या मुल्यांच्या नोटा छापण्यात आल्या नाहीत. या नोटांची छपाई बंद केली असल्याचे लोकसभेत याआधीच सांगण्यात आले होते. त्यामुळे एटीएममधून दोन हजाराच्या नोटा निघत नसल्याचे तसेच, बँकेतही दोन हजारांच्या नोटा उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. जास्त मूल्याच्या नोटा छपाईसाठी खर्च जास्त येतो त्यामुळे दोन हजाराच्या नोटांची छपाई केली जात नसल्याचे सांगितले जात आहे.

1 लाख मुल्यांच्या चलनी नोटांमध्ये 32 हजार 910 मुल्याच्या दोन हजाराच्या नोटा असे प्रमाण असल्याचे 2019 साली जाहीर झालेल्या रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार सिद्ध होते. मात्र, मार्च 2021 मध्ये ते 24 हजार 510 वर आले. तर 31 मार्च 2021 मध्ये चलनातील एकूण नोटांच्या तुलनेत 2 हजार आणि 500 रुपयांच्या नोटांचे प्रमाण 85 टक्के होते.

किरकोळ व्यवहारासाठी 2 हजाराच्या नोटा अडचणीच्या ठरतात. त्यामुळे अनेक बँकांमधून आता 2 हजाराच्या नोटांसाठी असलेले बॉक्स काढून टाकण्यात येत आहे. तर, त्याजागी 500 रुपयांच्या नोटांचा बॉक्स टाकण्यात येत आहे. . एटीएममध्ये नोटा भरणाऱ्या कंपन्यांना २ हजाराच्या नोटा दिल्या जात नाहीत कारण या नोटा कमी आहेत. मात्र, असे असले तरीही दोन हजारांच्या नोटा बंद झालेल्या नाहीत. त्यामुळे दोन हजारांच्या नोटा आल्यास त्या नाकारू नये, केवळ चलनातून या नोटा हळूहळू कमी झाल्या आहेत, असं सांगण्यात येत आहे.

Scroll to Top