LIC secures Guinness World Record for selling policies | देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या एलआयसीने खास कामगिरी केली आहे. कंपनीने सर्वाधिक विमा पॉलिसी विक्रीची कामगिरी केली आहे.
सरकारी मालकीच्या भारतीय आयुर्विमा महामंडळाने (Life Insurance Corporation of India) एक अभूतपूर्व कामगिरी करत २४ तासांत सर्वाधिक जीवन विमा पॉलिसी (life insurance policies) विक्रीचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड (Guinness World Record) आपल्या नावे केला आहे.
या ऐतिहासिक विक्रमाची अधिकृत नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने घेतली असून, २० जानेवारी २०२५ रोजी एलआयसीच्या एजंट नेटवर्कने देशभरात एकाच दिवशी विक्रमी जीवन विमा पॉलिसी पूर्ण केल्या.
एलआयसीने दिलेल्या माहितीनुसार, या दिवशी ४,५२,८३९ एजंट्सनी एकूण ५,८८,१०७ जीवन विमा पॉलिसी यशस्वीरित्या पूर्ण करून वितरित केल्या. आतापर्यंत 24 तासात सर्वाधिक जीवन विमा पॉलिसी विक्रीचा हा विक्रम आहे.
एलआयसीने या विक्रमाबद्दल “अत्यंत आनंद” व्यक्त करत म्हटले की, “हे आमच्या एजंट्सच्या समर्पण, कौशल्य आणि परिश्रमांची साक्ष आहे. आमचा हेतू ग्राहक आणि त्यांच्या कुटुंबांना सुरक्षितता देण्याचा आहे आणि ही कामगिरी त्याच वचनबद्धतेचे प्रतीक आहे.”
हा विक्रम एलआयसीचे सीईओ आणि एमडी सिद्धार्थ मोहंती यांच्या ‘मॅड मिलियन डे’ (‘Mad Million Day’) या संकल्पनेचा परिणाम होता. त्यांनी सर्व एजंट्सना २० जानेवारी रोजी किमान एक पॉलिसी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट दिले होते. मोहंती यांनी विक्रमी कामगिरी करणाऱ्या ग्राहक, एजंट आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानत म्हटले की, “ही यशोगाथा आता जागतिक स्तरावर पोहोचली असून, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.”