Home / क्रीडा / बंगळुरूची 17 वर्षांची प्रतीक्षा संपली! अंतिम सामन्यात पंजाबवर 6 धावांनी मात

बंगळुरूची 17 वर्षांची प्रतीक्षा संपली! अंतिम सामन्यात पंजाबवर 6 धावांनी मात

अहमदाबाद- जगातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू गणल्या गेलेल्या विराट कोहलीला एक शल्य गेली सतरा वर्षे सतावत होते. अनेक आयसीसी चषकांवर नाव कोरणाऱ्या...

By: E-Paper Navakal


अहमदाबाद- जगातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू गणल्या गेलेल्या विराट कोहलीला एक शल्य गेली सतरा वर्षे सतावत होते. अनेक आयसीसी चषकांवर नाव कोरणाऱ्या विराटला आयपीएल ट्रॉफी एकदाही जिंकता आली नव्हती. काल अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या आयपीएलच्या अंतिम सामन्यात त्याच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्ज इलेव्हनला 6 धावांनी हरवले आणि विराटचे ते स्वप्न साकार झाले. अटीतटीच्या सामन्याने प्रेक्षकांचा श्वास रोखून धरला. पण अंतिम क्षणी बंगळुरूचा संघ सरस ठरला. पंजाबची पहिल्यांदा विजेतेपदाची संधी थोडक्यात हुकली.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यावर आधी पावसाचे सावट होते. मात्र निसर्गाने कृपा केल्याने हा सामना वेळेवर सुरू झाला. त्याआधी पंजाब किंग्ज इलेव्हनने नाणेफेक जिंकून बंगळुरुच्या संघाला फलंदाजीसाठी पाचारण केले. अंतिम सामन्याचे दडपण घेऊन बंगळुरुची सलामीची जोडी फिल सॉल्ट व विराट कोहली मैदानात उतरले. सॉल्टने एक षटकार मारून थोडी रंगत आणली. मात्र फटकेबाजीच्या नादात तो केवळ 16 धावा काढून बाद झाला. मयांक अग्रवालने 18 चेंडूंत 24 धावा फटकावल्या. मात्र चहलने त्याला अर्शदीपकडे सीमारेषेवर झेल द्यायला भाग पाडले. त्यानंतर कर्णधार रजत पाटीदार मैदानात आला. तोही 16 चेंडूंत 26 धावा काढून बाद झाला. त्यानंतर लिविंगस्टोन फलंदाजीसाठी आला. कोहलीने एक बाजू लावून धरली होती. मात्र तोही 35 चेंडूंत 43 धावा काढून बाद झाला. गेल्यावेळी आपल्या संघाला विजय मिळवून देणारा जितेश शर्मा खेळायला आला. या दोघांची जोडी जमतेय असे वाटत असतानाच संघाच्या 167 धावा झाल्या असताना लिव्हींगस्टोनही 25 धावांवर बाद झाला. त्यानंतर शेफर्ड फलंदाजीसाठी आला. त्या पाठोपाठ जितेश 10 चेंडूंत 24 धावा काढून बाद झाला. त्यानंतर बंगळुरुचे एकापाठोपाठ एक फलंदाज बाद होत गेले व त्यांना वीस षटकांत केवळ 9 बाद 190 धावाच करता आल्या.
पंजाबकडून गोलंदाजी करताना अर्शदीप सिंगने 40 धावा देऊन 3 तर जॅमेलसनने 48 धावा देऊन 3 गडी बाद केले. ओमरझाई, यशाक कुमार व चहलना प्रत्येकी एक एक बळी मिळाले.
विजयासाठी 191 धावांचे आव्हान घेऊन पंजाब किंग्जची सलामीची जोडी प्रियांश आर्य व प्रभासिमरन सिंग मैदानात उतरले. दोघांनी 43 धावांची सलामी दिली. त्यानंतर प्रियांशचा एक अप्रतिम झेल सॉल्टने पकडला व तो 24 धावांवर बाद झाला. हा झेल घेतल्यानंतर सॉल्ट सीमारेषेबाहेर गेला. मात्र त्याने चेंडू उंच फेकून सीमेच्या आत येऊन तो पुन्हा झेलला. त्यानंतर इंग्लिसने आपल्या बाजूने संघाच्या धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न केला असला तरी श्रेयस अय्यरने निराशा केली व तो केवळ 1 धाव काढून तंबूत परतला. इंग्लिसही 39 धावांवर सीमारेषेवर झेल देऊन बाद झाला. त्याच्या जागी शंशाक सिंग मैदानात आला. वढेराबरोबर त्याने 38 धावांची भागीदारी केल्यानंतर वढेरा केवळ 15 धावांवर बाद झाला. मार्क्युलर स्टोनीसने त्याची जागा घेतली. आल्याआल्या त्याने षटकार खेचला. मात्र पुढच्याच चेंडूवर तो भुवनेश्वर कुमाराच्या चेंडूवर झेलबाद झाला. त्यानंतर आलेल्या ओमरझाईला देखील केवळ एकच धाव करता आली. शंशाक सिंगचा शेवटच्या षटकात एक षटकार हुकला नसता तर हा सामना बरोबरीतच सुटला असता.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या