Asia Cup 2025: भारत आणि पाकिस्तानमध्ये आशिया कप 2025 चा अंतिम सामना होणार आहे. एकीकडे क्रिकेट चाहते या सामन्याची वाट पाहत असताना, सोशल मीडियावर देखील याची जोरदार चर्चा रंगली आहे. बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनने (Abhishek Bachchan) नुकताच पाकिस्तान क्रिकेट संघाला त्याच्या खास विनोदी शैलीत जोरदार टोला लगावला आहे.
एका मुलाखतीमध्ये पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) भारतीय सलामीवीर अभिषेक शर्माचे नाव चुकून ‘अभिषेक बच्चन’ घेतले. यावर अभिनेता अभिषेक बच्चनने लगेच प्रतिक्रिया दिली.
नेमके काय घडले?
एका क्रिकेट चर्चा कार्यक्रमात शोएब अख्तर आगामी आशिया चषक (Asia Cup) फायनलमध्ये पाकिस्तानच्या संधींचे विश्लेषण करत होता. चर्चेदरम्यान गडबडीत तो म्हणाला, ” जर पाकिस्तानने अभिषेक बच्चनला लवकर बाद केले, तर त्यांच्या मधल्या फळीचे काय होईल? त्यांची मधली फळी चांगली कामगिरी करत नाहीये.”
शोएब अख्तरचे हे विधान ऐकून पॅनेलवर हशा पिकला. शोचे होस्ट आणि इतर पाहुण्यांनी त्याला तातडीने दुरुस्त केले की, त्याला सलामीवीर अभिषेक शर्माचा उल्लेख करायचा आहे. अभिषेक शर्मा सध्या दमदार फॉर्ममध्ये असून त्याने लागोपाठ दोन अर्धशतके झळकावली आहेत. मात्र, क्रिकेटरच्या ऐवजी अभिनेत्याचे नाव चुकून घेतल्याने हा व्हिडिओ व्हायरल झाला.
Sir, with all due respect… don’t think they’ll even manage that! And I’m not even good at playing cricket. 🙏🏽 https://t.co/kTy2FgB10j
— Abhishek 𝐁𝐚𝐜𝐡𝐜𝐡𝐚𝐧 (@juniorbachchan) September 26, 2025
अभिषेक बच्चनने लगावला टोला
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (Twitter) वर सक्रिय असणाऱ्या अभिषेक बच्चनने या व्हायरल बातमीवर हलक्याफुलक्या पद्धतीने प्रतिक्रिया दिली. त्याने लिहिले, “सर, तुमचा आदर ठेवून सांगतो, मला नाही वाटत की ते (पाकिस्तान संघ) तेवढेही करू शकतील! आणि मला तर क्रिकेट खेळताही चांगले येत नाहीये.”
अभिषेक बच्चनचे हे ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले.
दरम्यान, 28 सप्टेंबरला भारत-पाकिस्तान यांच्यात आशिया कपचा अंतिम सामना रंगणार आहे. याआधीच्या स्पर्धेतील दोन सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा पराभव केला आहे.
हे देखील वाचा – संयुक्त राष्ट्रात मोठा ड्रामा! गाझामधील कारवाईवरून इस्रायलला धक्का; नेतन्याहूंचे भाषण सुरू असताच अनेक देशांच्या प्रतिनिधींचा सभात्याग