Abhishek Sharma : भारतीय संघ टी-20 विश्वचषक 2026 च्या सुपर 8 फेरीसाठी सज्ज झाला असून रविवारी अहमदाबाद येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला सामना रंगणार आहे. या महत्त्वाच्या लढतीपूर्वी सलामीवीर अभिषेक शर्माचा फॉर्म टीम इंडियासाठी चिंतेचा विषय ठरत आहे.
अभिषेक या स्पर्धेत आतापर्यंत सलग 3 सामन्यांत एकही धाव न काढता बाद झाला आहे. मात्र, भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केल यांनी अभिषेकच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे.
ड्रेसिंग रूममध्ये कोणतीही चर्चा नाही
अभिषेकच्या खराब फॉर्मवर संघात काही विशेष चर्चा सुरू आहे का, असे विचारले असता मॉर्केल म्हणाले की, “अभिषेकच्या फॉर्मबद्दल संघात कोणतीही नकारात्मक चर्चा झालेली नाही. तो एक जागतिक दर्जाचा खेळाडू आहे. सुदैवाने, या स्पर्धेत आतापर्यंत अभिषेकला धावा करता आल्या नसतील तरी इतर फलंदाजांनी त्याची उणीव भासू दिली नाही आणि डावा सावरला आहे.”
एका चांगल्या सुरुवातीची गरज
प्रशिक्षक मॉर्केल यांनी पुढे सांगितले की, आता विश्वचषक एका अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला असून अभिषेककडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. “अभिषेकची फलंदाजी प्रेक्षकांसाठी नेहमीच मनोरंजक असते आणि आम्हाला तो पुन्हा लयीत आलेला पाहायला आवडेल. तो नेटमध्ये चेंडू चांगल्या प्रकारे हिट करत आहे. एकदा त्याला मैदानावर चांगली सुरुवात मिळाली की तो पुन्हा आपल्या जुन्या फॉर्मात परत येईल, याची आम्हाला खात्री आहे,” असा विश्वास मॉर्केल यांनी व्यक्त केला.
गौतम गंभीरकडून खास मार्गदर्शन
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी अभिषेक शर्माने नेटमध्ये मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यासोबत बराच वेळ घालवला. गंभीर यांनी स्वतः उभे राहून अभिषेकच्या फलंदाजीचे निरीक्षण केले आणि त्याला काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या. त्यानंतर अभिषेकने क्षेत्ररक्षणाचाही कसून सराव केला.
सुपर 8 फेरीतील आव्हाने पाहता अभिषेक शर्माने सलामीला येऊन संघाला आक्रमक सुरुवात करून देणे भारतासाठी अत्यंत आवश्यक आहे.










