Asia Cup 2025: आशिया कप 2025 मध्ये भारत-पाकिस्तान सामन्यात झालेल्या ‘हँडशेक’ वादावर अखेर पडदा पडला आहे. सामन्यातील काही निर्णयांवरून नाराज झालेल्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांना पदावरून हटवण्याची मागणी केली होती.
या मागणीवर ICC ने सुरुवातीला नकार दिला होता, मात्र वाद वाढल्यानंतर अखेर तडजोड झाली. रिपोर्टनुसार, आता पाकिस्तानच्या पुढील सामन्यांमध्ये अँडी पायक्रॉफ्ट हे रेफरी म्हणून काम पाहणार नाहीत. त्यांच्या जागी आता रिची रिचर्डसन पाकिस्तानच्या आगामी सामन्यांसाठी मॅच रेफरी म्हणून काम पाहतील.
वादाचे मूळ काय?
रविवारी झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यानंतर भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन केले नाही. त्यांनी त्याऐवजी पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील 26 पीडितांना श्रद्धांजली वाहिली.
भारतीय खेळाडूंच्या या भूमिकेवर PCB ने आक्षेप घेतला होता आणि अँडी पायक्रॉफ्ट यांनी नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करत त्यांना स्पर्धेतून हटवण्याची मागणी केली. जर पायक्रॉफ्ट यांना हटवले नाही तर स्पर्धेतून माघार घेण्याची धमकीही पाकिस्तानने दिली होती.
जर त्यांनी माघार घेतली असती तर PCB ला अंदाजे 16 दशलक्ष डॉलर्सचे (सुमारे 133 कोटी रुपये) मोठे नुकसान झाले असते. अखेर, आता आयसीसीने रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांना पाकिस्तानच्या सामन्यांपासून लांब ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
पाकिस्तानची मागणी मान्य झाल्यामुळे PCB चे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांना मोठा दिलासा मिळाला. नक्वी हे पाकिस्तानचे गृहमंत्रीही असल्याने हे प्रकरण अधिक संवेदनशील बनले होते. दुसरीकडे, या वादाचा परिणाम पाकिस्तान संघावरही दिसून आला. पाकिस्तानच्या संघाची पूर्वनियोजित पत्रकार परिषद रद्द करण्यात आली होती.
दरम्यान, आज पाकिस्तान आणि यूएईमध्ये सामना पार पडणार आहे. या सामन्यात पाकिस्तानला सुपर-4 मध्ये जाण्यासाठी विजय मिळवणे आवश्यक आहे.
हे देखील वाचा – दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ला पडतोय ‘काळा’; कारण काय? वाचा