BCCI Central Contracts: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) २०२५-२६ या वर्षासाठी पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंच्या वार्षिक कराराची घोषणा केली आहे. १ ऑक्टोबर २०२५ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीसाठी लागू होणाऱ्या या यादीत मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे अनुभवी खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना सर्वोच्च श्रेणीतून खाली आणण्यात आले आहे.
पुरुष संघ: ‘Grade A+’ श्रेणी बंद
बीसीसीआयने यावेळी ७ कोटी रुपये मानधन असलेली ‘ए प्लस’ श्रेणी रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. आता ‘ग्रेड ए’ हीच सर्वोच्च श्रेणी असणार आहे. यामध्ये केवळ ३ खेळाडूंना स्थान मिळाले आहे.
- ग्रेड ए (५ कोटी रुपये): शुभमन गिल, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा.
- ग्रेड बी (३ कोटी रुपये): रोहित शर्मा, विराट कोहली, वॉशिंग्टन सुंदर, केएल राहुल, मोहम्मद सिराज आणि हार्दिक पंड्या.
- ग्रेड सी (१ कोटी रुपये): अक्षर पटेल, तिलक वर्मा, रिंकू सिंह, संजू सॅमसन, अर्शदीप सिंह, ऋतुराज गायकवाड यांच्यासह एकूण १६ खेळाडू.
रोहित आणि विराट यांनी टी20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याने ते आता केवळ एकाच प्रकारच्या क्रिकेटमध्ये सक्रिय आहेत. बीसीसीआयच्या नियमानुसार, एकाच फॉरमॅटमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना सर्वोच्च श्रेणीत ठेवता येत नसल्याने त्यांची ग्रेड बी मध्ये घसरण झाली आहे.
महिला संघ: जेमिमाला बढती
महिला क्रिकेटपटूंच्या यादीतही महत्त्वाचे बदल झाले आहेत. एकूण २१ महिला खेळाडूंना वार्षिक करार देण्यात आला आहे.
- ग्रेड ए (५० लाख रुपये): हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, दीप्ती शर्मा आणि जेमिमा रॉड्रिग्ज.
- ग्रेड बी (३० लाख रुपये): शेफाली वर्मा, ऋचा घोष, रेणुका सिंह ठाकूर आणि स्नेह राणा.
- ग्रेड सी (१० लाख रुपये): या श्रेणीत १३ महिला खेळाडूंचा समावेश आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विश्वचषकातील चमकदार कामगिरीमुळे जेमिमा रॉड्रिग्जला ग्रेड बी मधून ए मध्ये बढती मिळाली आहे, तर स्नेह राणानेही चांगली कामगिरी करत ग्रेड बी मध्ये स्थान मिळवले आहे.









