IPL पुन्हा सुरू होणार? ‘या’ शहरांमध्ये पार पडू शकतात उर्वरित सामने

BCCI Planning IPL Resumption

BCCI Planning IPL Resumption | भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 चा उर्वरित हंगाम लवकरच पुन्हा सुरू करण्याच्या तयारीत आहे. भारत आणि पाकिस्तानमधील (India and Pakistan) सध्याच्या लष्करी तणावामुळे ही स्पर्धा एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आली होती.

रिपोर्टनुसार, आता उर्वरित स्पर्धा लवकरच पार पडणार आहे. बीसीसीआय उर्वरित सामने देशाच्या पूर्व आणि दक्षिण भागातील शहरांमध्ये खेळवण्याचा विचार करत आहे. याबाबत ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने वृत्त दिले आहे.

अशा परिस्थितीत एक आठवडा खूप मोठा काळ असतो. बोर्ड एक आपत्कालीन योजना तयार करत आहे. प्राथमिक माहितीनुसार, जर लीग पुढील आठवड्यात पुन्हा सुरू झाली तर कोलकाता, हैदराबाद, चेन्नई आणि बेंगळुरू यांसारख्या शहरांमध्ये उर्वरित आयपीएल सामने खेळवण्याचा विचार बीसीसीआय करत आहे. जर सीमावर्ती भागात तणाव कमी झाला, तर बोर्ड सर्व मूळ ठिकाणे देखील कायम ठेवू शकते., असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

जर दोन्ही देशांमधील संघर्ष वाढत राहिला, तर बीसीसीआय जून ते ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या इंग्लंडच्या आगामी भारतीय कसोटी दौऱ्यानंतरच्या मोकळ्या वेळेत उर्वरित सामने आयोजित करण्याचा विचार करू शकते.

जर स्पर्धा लवकर सुरू झाली नाही, तर उर्वरित वेळापत्रकात, विशेषत: सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आशिया कपवर याचा परिणाम होऊ शकतो. भारत या स्पर्धेचा यजमान आहे.

तसेच, स्पर्धा आणखी काही दिवस पुढे ढकलल्यास दोन शेजारील देशांमधील वाढत्या लष्करी संघर्षामुळे परदेशी खेळाडू भारतात राहण्यास इच्छुक असतील की नाही, याचाही विचार बीसीसीआयला करावा लागणार आहे.