Asia Cup 2025: आशिया चषक 2025 च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला हरवून भारताने (Team India) विजेतेपद पटकावले, मात्र ट्रॉफी आणि खेळाडूंच्या पदकांचे वितरण अजूनही झालेले नाही. या वादावरून बीसीसीआय (BCCI) आणि एशियन क्रिकेट काउन्सिलमध्ये (ACC) मोठा तणाव निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.
इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, एसीसीच्या ऑनलाईन बैठकीतून बीसीसीआयचे प्रतिनिधी आशिष शेलार यांनी ट्रॉफी कधी मिळेल, यावर स्पष्टता न मिळाल्याने निषेध म्हणून माघार घेतली. बीसीसीआयचे माजी कोषाध्यक्ष असलेले शेलार आणि राजीव शुक्ला यांनी एसीसीचे अध्यक्ष व पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) प्रमुख मोहसिन नक्वी यांच्याकडे या विषयावर स्पष्टीकरण मागितले, परंतु नक्वी समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत.
बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांची नाराजी
एका वरिष्ठ बीसीसीआय अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, “शेलार यांनी बैठकीत सांगितले की, बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी यापूर्वीच एसीसीला याबद्दल पत्र लिहिले आहे, पण त्यावर कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.
ट्रॉफी आणि पदके एसीसीच्या दुबईतील कार्यालयात पाठवायची आहेत, जिथून भारतीय बोर्ड ती घेऊन जाईल. मात्र, या मागणीला सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने शेलार आणि शुक्ला यांनी निषेध म्हणून बैठकीतून माघार घेतली.” विशेष म्हणजे, नक्वी यांनी आपल्या सुरुवातीच्या भाषणात टीम इंडियाचे विजेतेपदाबद्दल अभिनंदनही केले नव्हते, अशी माहितीही या अधिकाऱ्याने दिली.
फाइनलमध्येही झाला होता मोठा ड्रामा
दरम्यान, आशिया कपच्या अंतिम सामन्यात टॉसच्या वेळी भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगा याच्याशी हस्तांदोलन करण्यास स्पष्टपणे नकार दिला होता.
सामन्यानंतर बक्षीस वितरण सोहळ्यातही मोठे नाट्य घडले. टीम इंडियाने नक्वी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला होता. यानंतर सूर्यकुमार यादवने सांगितले की, भारतीय खेळाडूंनी ड्रेसिंग रूममध्ये न जाता जवळपास एक तास बाहेर उभे राहून ट्रॉफी मिळण्याची वाट पाहिली होती. सूर्यकुमार यादवने त्यावेळी बोलताना नाराजी व्यक्त केली होती.
हे देखील वाचा – आशिया कपनंतर आता भारत ‘या’ संघाविरुद्ध उतरणार मैदानात; पाहा डिटेल्स